भोपाळ : वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म. गांधीजींचा ‘राष्ट्रपिता’ऐवजी ‘राष्ट्रपुत्र’ असा उल्लेख केल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची लक्षणे दिसत आहेत.

म. गांधीजी हे राष्ट्रपुत्र असून देश त्यांच्यावर कायम प्रेम करीत राहील, असे ठाकूर यांनी भोपाळमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. म. गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त भाजपने मध्य प्रदेशात गांधी संकल्प यात्रेचे आयोजन केले होते, मात्र ठाकूर त्यामध्ये सहभागी झाल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. त्या म्हणाल्या, की गांधीजी हे राष्ट्राचे पुत्र आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदराचीच भावना आहे, त्यामुळे आता कसलेही स्पष्टीकरण देण्याची आपल्याला गरज नाही, देशासाठी ज्यांनी काम केले ते सर्वजण आपल्यासाठी आदरणीय आहेत. म. गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर आपण कायम चालत राहू, असे यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म. गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याचा राष्ट्रभक्त असा उल्लेख केला होता. त्यावरून गदारोळ माजला होता.