भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लालकृष्ण अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन आज सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गडकरी आणि अडवाणी यांच्यामध्ये १५ मिनिटे चर्चा झाली. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आज (गुरुवार) ८५वा वाढदिवस आहे.
अडवाणी हे भारतीय राजकारणातील जेष्ठ आणि अभ्यासू नेते असून सर्वच पक्षातील नेत्यांमध्ये त्यांच्याबाबत भरपूर आदर आहे, त्यामुळे आज भाजपबरोबरच इतर पक्षातील नेतेही त्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची शक्यता आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप आणि स्वामी विवेकानंद व दाऊद इब्राहिम यांच्या आयक्यूची तुलना केल्यानंतर गडकरी यांचे अध्यक्षपद धोक्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांना क्लिन चीट देण्यात आली होती. परंतू, या बैठकीला अडवाणी गैरहजर होते त्यामुळे विविध तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, आज गडकरींनी अडवाणींची भेट घेतल्यामुळे त्यास तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.
अडवाणींना शुभेच्छा देण्यासाठी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे.