काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी केलेल्या वादग्रस्त टि्वटचा भाजपाने खरपूस समाचार घेतला आहे. हिंदी, हिंदू आणि हिंदुत्वाची विचारधारा आपल्या देशाचे विभाजन करत आहे. आपल्याला समानतेची नाही तर एकतेची गरज आहे असे टि्वट थरुर यांनी केले आहे. थरुर यांच्या या टि्वटला मुद्दा बनवून भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शशी थरुर यांनी केलेले टि्वट अत्यंत आपत्तीजनक आणि दु:खद आहे. आमचा त्यावर आक्षेप आहे. काँग्रेस हिंदू धर्मावर आघात करत असून वारंवार हिंदू धर्माला शिव्या देत आहे. यातून काँग्रेसचा खरा चेहरा दिसतो असे संबित पात्रा म्हणाले. हिंदू देशाला विभाजीत करतोय हे थरुर आणि काँग्रेसचे म्हणणे आहे. कुंभ मेळयातील स्नानावरुनही थरुर यांनी हिंदू धर्माची खिल्ली उडवली होती.

थरुर यांचे टि्वट अपघात नसून हे विचारपूर्वक रचण्यात आलेले कारस्थान आहे असा आरोप संबित पात्रा यांनी केला. काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी सुद्धा हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. मते कमी झाली. हिंदू जागा होतोय हे लक्षात आल्यानंतर आता राहुल गांधींनी हिंदू रुप धारण केले आहे अशी टीका पात्रा यांनी केली.  काँग्रेस रोज चिडून राम मंदिरावर प्रश्न विचारते. फोडा आणि राज्य करा हे नेहरु गांधी, वाड्रा कुटुंबाचे राजकरण आहे असे संबित पात्रा यांनी सांगितले.