भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी विराजमान होण्याच्या चर्चांचे खंडन केले आहे. आपण आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी विराजमान होणाचे वृत्त खरे नसल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करून सुषमा स्वराज यांचे आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्यांच्या ट्विटनंतर स्वराज यांनी ट्विट करत हे वृत्त खरे नसल्याची माहिती दिली. त्यानंतर हर्षवर्धन यांनी ट्विटवरून ते ट्विट डिलिट केले होते.

भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माझ्या बहिण माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्याच्या जनतेला होईल, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले होते. त्यानंतर काही मिनिटांनी त्यांनी आपले ट्विट डिलिट केले.

गेल्या वर्षीच स्वराज यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याची घोषणा केली होती. परंतु आपण राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. स्वराज या भाजपाच्या प्रमुख चेहऱ्यांमधून एक मानल्या जातात. तब्येतीचे कारण सांगत स्वराज यांनी निवडणूक लढवण्याला नकार दिला होता. यापूर्वी एम्समध्ये त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.