स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला आहे. उमा भारती यांनी आसाराम बापू यांच्यावर होणाऱ्या लैगिक अत्याचाराच्या आरोपांचे खंडन करत आसाराम याची पाठराखण केली आहे. याचाच दाखला देत,  भाजप बलात्काराच्या इतर आरोपींबाबत फाशीच्या शिक्षेची मागणी करत आहे व दुसऱ्या बाजूला भाजप भोंदू देवपुरूषाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिग्विजय सिंग म्हणाले. 
भाजपच्या उपाध्यक्षा उमा भारती व इतर नेत्यांनी आसाराम बापूंवर होणारे आरोप राजकीय प्रेरणेतून होत असल्याचे म्हणत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
“आसाराम बापू काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत असत. राजस्थान व दिल्लीमधील काँग्रेसच्या राज्य सरकारांवर त्यांनी ताशेरे ओढले होते. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय प्रेरणेतून या लैगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत.” असे उमा भारती म्हणाल्या होत्या.