भारताचे १३ वे राष्ट्रपती निवडण्याच्या प्रक्रियेने आजपासून अधिक वेग घेतला आहे. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून कोण उमेदवार असणार? याची घोषणा आता २३ जून रोजी होणार आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. NDA तर्फे उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.  २३ जूनला एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केला जाणार आहे.

विरोधी पक्षानेही राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी जोर लावला आहे. आज संध्याकाळी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, जेडीयूचे शरद यादव, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, राजदचे लालूप्रसाद यादव, सीपीएमचे सीताराम येचुरी, बसपाचे सतीश मिश्रा या सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एका कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली. तसेच आज उमेदवार कधी जाहीर होणार याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

एनडीएकडे १७ पक्षांचे पाठबळ आहे अशी माहिती राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले आहे.आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्रिसदस्यीय समितीने आपण घेतलेले फिडबॅकही दिले आहेत. राष्ट्रपतीपद निवडणुकीत एनडीएचे पारडे जड असणार आहे. २५ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी म्हणजेच २३ जूनला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल ते जाहीर होणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपद निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. विरोधी पक्षांच्या गटात नेमके काय सुरू आहे याचा अंदाज एनडीएला घ्यायचा आहे. कारण विरोधकांतर्फे कोणाचे नाव सुचविले जाणार आहे हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.