काळवीट शिकार प्रकरणी शस्त्रास्त्र कायद्याखाली आपल्याला वन विभागाच्या अधिकाऱयांकडून गोवण्यात आल्याचा आरोप अभिनेता सलमान खान याने बुधवारी जोधपूरमधील न्यायालयात केला. या प्रकरणी आपल्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असून, आपण निर्दोष असल्याचे त्याने न्यायालयात सांगितले. पुढील सुनावणी चार मे रोजी होणार आहे.
काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानवर बेकायदा शस्त्रे बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी सलमान खान बुधवारी जोधपूरमधील न्यायालयात आला होता. त्याला गेल्याच आठवड्यात न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तब्येत बरी नसल्याचे सांगत तो न्यायालयात हजर झाला नव्हता.
बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी सलमान म्हणाला, मी निर्दोष आहे. मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱयांच्या सांगण्यावरूनच शस्त्रे आणण्यात आली होती. आपल्याला सविस्तरपणे आपली बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात यावी, अशीही मागणी त्याने केली.
जोधपूरजवळ कांकणी गावाबाहेर दोन काळवीटांची शिकार करण्यात आली होती. त्याच खटल्यामध्ये सलमान खानवर बेकायदा शस्त्रे बाळगल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, हिट अॅंड रन प्रकरणात न्यायालय येत्या सहा मे रोजी निकाल देणार आहे.