इटालियन तपास यंत्रणेचा अहवाल
‘दुसऱ्या बोफोर्स’ प्रकरणी भारतीय मध्यस्थांना देण्यात आलेली लाच महिन्याकाठी दिली जात होती व डिसेंबर, २०१२ मध्ये तिचा अखेरचा हफ्ता देण्यात आल्याचे इटालियन तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे. तब्बल ५१ दशलक्ष युरो लाच महिनाकाठी देण्यात आल्याचे तपास यंत्रणेच्या अहवालात म्हटले आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टरची निर्मिती करणाऱ्या फिनमेक्कानिका या इटालियन कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टावेस्टलॅण्डने ही लाचेची रक्कम पोहोचवल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे.
२००७ ते २०११ या कालावधीत २१ दशलक्ष युरो रक्कम लाच म्हणून पोहोचती करण्यात आली. त्यासाठी आयडीएस इंडिया आणि आयडीएस टय़ुनिशिया या दोन कंपन्यांची स्थापना करण्यात आली व त्यांना अभियांत्रिकी कंत्राटांच्या माध्यमातून पैसे पोहोचते करण्यात आले. विशेष म्हणजे या व्यवहारावर कोणतीही करआकारणी झाली नाही, याबाबतचे सर्व धागेदोरे इटालियन तपास यंत्रणेने जुळवले आहेत. ऑगस्टावेस्टलॅण्ड आणि गॉर्डियन सव्‍‌र्हिसेस यांच्यातील करारानुसार ही रक्कम पोहोचती केल्याचे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे देण्याघेण्याचा हा व्यवहार गेल्या वर्षांपर्यंत सुरू होता.