तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’द्वारे केलेल्या शक्तिप्रदर्शनाची दखल घेत केंद्र सरकारने बुधवारी संघटनांना प्रस्ताव पाठवला. मात्र, तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम राहिलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून १४ डिसेंबरला देशव्यापी आंदोलनाची हाक दिली. कृषी कायदे मागे घ्यावे ते शेतकऱ्यांच्या हिताचे नसून त्यामुळे काही ठराविक उद्योजकांना फायदा होणार आहे असं शेतकऱ्यांच म्हणणं आहे. दरम्यान, हा शेतकरी आंदोलनाचा मुद्दा ब्रिटनमधील संसदेतही गाजला. परंतु या मुद्द्याबाबत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना माहिती नसल्यानं त्यांनी दिलेल्या उत्तरावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

लेबर पार्टीचे खासदार तमनजीत सिंह धेसी यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारला. त्यांच्या या प्रश्नावर बोरिस जॉन्सन यांनी अनोखंच उत्तर दिलं. “भारत पाकिस्तान दरम्यान असलेल्या कोणत्याही समस्येवरील तोडगा हा द्विपक्षीय चर्चेतून काढला जाऊ शकतो,” असं जॉन्सन म्हणाले.

बोरिस जॉन्सन यांच्या उत्तरानंतर धेसी यांनी त्वरित ट्विटरवरून यावर टीका केली. जॉन्सन हे कोणत्या गोष्टींवर प्रतिक्रिया देत आहेत हे त्यांना माहित नाही असं म्हणत धेसी यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

यापूर्वी खासदारांचं पत्र

भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला ब्रिटनमधील ३६ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. ब्रिटनमधील लेबर पार्टीचे खासदार तनमनजीत सिंह धेसी यांच्या नेतृत्वाखाली ३६ ब्रिटिश खासदारांनी युनायटेड किंगडमचे सचिव डोमिनिक राब यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी कृषी कायद्यांविरोधात भारतावर दबाव टाकण्याची मागणी केली आहे. “त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ परराष्ट्र मंत्रालय आणि युकेच्या कार्यालयांमार्फत भारत सरकारशी चर्चा करावी,” असं खासदारांच्या गटाने रॉब यांना म्हटलं होतं.

ब्रिटिश सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्या

१) पंजाबमध्ये बिघडत चाललेली परिस्थिती आणि केंद्राशी असलेला याचा संबंध यासाठी एका महत्त्वाच्या बैठकीची मागणी करण्यात आली आहे.
२) भारतात जमीन आणि शेतीसाठी मोठ्या काळापासून जोडलेल्या ब्रिटिश शीखांसाठी आणि पंजाबींसाठी भारतीय अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करावी.
३) भारतीय परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगलांसोबत युके, परराष्ट्र आणि विकास कार्यालयांमार्फत चर्चा केली जावी.

या खासदारांनी दिलं समर्थन

भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना ज्या ब्रिटिश खासदारांनी पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये डेबी अब्राहम, मार्टिन डॉकर्टी ह्युजेस, एलन डोरांस, अँड्रूयू ग्वेने, अफजल खान, इयान लावेरी, इमा लावेरी, क्लाइव लेविस, टोनी लॉयड, खालिद महमूद, सीमा मल्होत्रा, स्टीव मॅककेब, डॉन मैकडोनेल, पॅट मॅकफेडेन, ग्राहम मोरिस, कार्लेइन नॉर्स आदींचा समावेश आहे.