ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी शुक्रवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. सात मे रोजी त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्याचदिवशी त्या कंझर्व्हेटीव्ह पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा देणार आहेत. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट कराराच्या मुद्यावर खासदारांचा पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. ब्रेक्झिट डीलवर तीनवेळा त्या ब्रिटीश संसदेची मंजुरी मिळवण्यात अपयशी ठरल्या.

ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटीव्ह पक्षाचे सरकार आहे. थेरेसा मे यांच्या निर्णयामुळे ब्रिटनमध्ये नवीन पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. ब्रेक्झिट करार मी पूर्ण करु शकले नाही याची मला आयुष्यभर खंत राहील. भाषण करताना त्या भावनिक झाल्या होत्या.

थेरेसा मे यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयामुळे पुढचे काही महिने ब्रिटनमध्ये अनिश्चितता राहू शकते. थेरेसा मे या ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या. ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषवणे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती असे त्यांनी सांगितले. थेरेसा मे यांचे सहकारी डेव्हीड कॅमरुन यांनी जुलै २०१६ मध्ये राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले होते. ब्रेक्झिटच्या विषयावर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीनंतर कॅमरुन यांनी राजीनामा दिला होता. ५२ टक्के ब्रिटीश जनतेने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजून कौल दिला होता.