नवी दिल्ली : आर्थिक चणचणीतील दोन सार्वजनिक दूरसंचार कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा एकदा थकविले आहे. बीएसएनएल व एमटीएनएल कंपनीने त्यांच्या एकूण १.९८ लाख कर्मचारी, अधिकाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन दिलेले नाही.

बीएसएनएल व एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यास सरकारला जुलैमध्ये पुन्हा अपयश आल्याचे ‘ऑल इंडिया युनियन्स अँड असोसिएशन्स ऑफ भारत संचार निगम लिमिटेड’चे समन्वयक पी. अभिमन्यू यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

दरम्यान, कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन ५ ऑगस्ट रोजी दिले जाईल, असे बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांनी स्पष्ट केले. बीएसएनएलमध्ये १.७६ लाख, तर एमटीएनएलचे २२ हजार कर्मचारी आहेत.

दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना महिन्याचे वेतन संबंधित महिन्याच्या शेवटच्या तारखेला मिळते. दोन्ही कंपन्यांचा मासिक वेतन खर्च १,०१० कोटी रुपये असून आर्थिक चणचणीपोटी फेब्रुवारी २०१९ पासून अदा प्रक्रियेत व्यत्यय येत आहे.