पीयुष गोयल यांना केंद्रीय रेल्वेमंत्रीपद मिळाल्याने आता रेल्वे खात्याचा कारभार आणखी सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. ‘कैफियत एक्स्प्रेस’ आणि ‘उत्कल एक्प्रेस’ या दोन अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच सोपवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश प्रभू यांना थोडे थांबा एवढेच सांगितले होते आणि राजीनामा स्वीकारला नव्हता. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या वेळी रेल्वे खाते दुसऱ्या मंत्र्याला दिले जाणार याची चर्चा होतीच.

याआधी पीयुष गोयल हे राज्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे उर्जा आणि कोळसा खात्याचा स्वतंत्र कार्यभार होता. या खात्यात पीयुष गोयल यांनी मोठ्या सुधारणा घडवून आणल्या. २०१४ मध्ये भारतात अशी १८ हजार गावे होती ज्या गावांमध्ये वीज पोहचली नव्हती, मागील तीन वर्षांच्या काळात म्हणजेच पीयुष गोयल यांनी कार्यभार सांभाळल्यापासून ही संख्या ४ हजार गावांवर आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी प्रचार, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांसोबत संवाद साधण्याची जबाबदारी पीयुष गोयल यांच्यावर टाकण्यात आली होती. या जबाबदारीचे शिवधनुष्यही पीयुष गोयल यांनी लिलया पेलले.

एक यशस्वी चार्टड अकाऊंटंट आणि बँकर म्हणूनही एकेकाळी गोयल यांचा लौकिक होता. या सगळ्या कारणांमुळेच पीयुष गोयल यांना राज्यमंत्रीपदावरून बढती देत कॅबिनेटमंत्रीपद देण्यात आले तसेच रेल्वेसारख्या महत्त्वाच्या खात्याची धुरा त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. आता येत्या दोन वर्षात रेल्वेत वैविध्यपूर्ण बदल होऊन होणारे अपघात कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार? याची चर्चा सुरू असताना पीयुष गोयल यांच्याकडे अरूण जेटली सांभाळत असलेले अर्थ खाते देण्यात येईल अशीही एक चर्चा रंगली होती. मात्र तसे झाले नाही, दरम्यान पीयुष गोयल यांना रेल्वे खाते जाहीर झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे.