कांद्याचे दर कधी खाली येतील, हे सांगू शकणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी सांगितले. दरवर्षी कांदा उत्पादक राज्यांमधून होणारी आवक यंदा पावसामुळे कमी झालीये. त्यामुळे दर कधी खाली येतील, हे आता सांगता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले. 
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दराचा आलेख चढताच राहिला आहे. राजधानी नवी दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यात कांद्याचा दर प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. तो आता ६० रुपयांपर्यंत खाली आला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात कांद्याचा दर प्रतिकिलो ५० रुपयांपेक्षा जास्तच आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले, कांद्याच्या दरांबद्दल मी काही सांगू शकणार नाही. पिकांबद्दल मला माहिती आहे. दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झालाय. सध्या देशाचा एकूण विचार करता पिकांची स्थिती चांगली आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतून कांद्याची आवक होणे अपेक्षित आहे. मात्र, पावसामुळे तेथील दळणवळणावरही परिणाम झाला आहे, असे त्यांनी सांगितले.