दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या ताब्यातील १०० किलो सोने गहाळ झाल्याप्रकरणी सीबीआयने गुरुवारी कारवाई केली. सीबीआयने सीमाशुल्क विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केली आहे. सोने गहाळ करण्यामागे या अधिकाऱ्याचा हात असल्याचा प्राथमिक संशय आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर तस्करी करुन आणलेले सोने सीमाशुल्क विभागाकडून जप्त केले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये सीमाशुल्क विभागाने जप्त केलेले सोने गहाळ होण्याचे समोर आले होते. आत्तापर्यंत सुमारे १०० किलो सोने गहाळ झाले असून याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने तक्रारही दाखल केल्या होत्या. बुधवारी सीबीआयने सीमाशुल्क विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केल्याचे एएनआयने म्हटले आहे.

विमानतळांवर होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमाशुल्क विभाग अर्थात कस्टमचे अधिकारी डोळ्यात तेल घालून काम करत असतात. विमानतळावर जप्त केलेले सोने हे सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात असते. याची वार्षिक तपासणीही केली जाते. या दरम्यान पकडले जाऊ नये यासाठी सोन्याचे बनावट दागिनेही आणून ठेवले जात असल्याचे समोर आले होते. २०१६ मध्ये सीमाशुल्क विभागाने पोलीस आणि सीबीआय़कडे तक्रारही दाखल केली होती.