रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना परिचित असलेल्या आवर्ती सारणीला दीडशे वर्षे पूर्ण झाली असून संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को या संस्थेने त्यानिमित्ताने वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मूलद्रव्यांच्या संज्ञांचा समावेश आवर्ती सारणीत असतो, त्यात अणूतील प्रोटॉनच्या संख्येनुसार मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे.

रशियन वैज्ञानिक दिमीत्री मेंडेलीव्ह याने पहिल्यांदा १८६९ मध्ये आवर्ती सारणी प्रसिद्ध केली होती. युनेस्कोने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय रासायनिक मूलद्रव्ये आवर्तीसारणी वर्ष म्हणून जाहीर केले आहे, त्यात मंगळवारी झालेल्या पहिल्या कार्यक्रमात रसायनशास्त्राचे नोबेल विजेते व रशियाचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री उपस्थित होते. या निमित्ताने युनेस्को या संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक संघटनेने मुलांना आवर्तीसारणीचे आकलन कितपत आहे यासाठी काही स्पर्धात्मक परीक्षा आयोजित केल्या आहेत. जगभरातील शाळांमध्ये या परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. जवळपास प्रत्येक शाळेच्या भिंतीवर ही मूलद्रव्यांची आवर्ती सारणी विराजमान झालेली दिसते. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम यासारख्या अनेक मूलद्रव्यांची नावे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावी लागतात. मेंडेलिव्हने त्याकाळात मांडेलली आवर्तीसारणीची संकल्पना काळाच्या कसोटीवर उतरली आहे. रसायनशास्त्राचे सर्व नियम या आवर्तीसारणीभोवती फिरतात. मेंडेलिव्हने १८६९ मध्ये  आवर्ती सारणी पहिल्यांदा मांडली, त्यात ६३ अज्ञात मूलद्रव्यांचा समावेश होता. सुरूवातीच्या काळात त्यांच्या अणुभारानुसार त्यांची मांडणी केलेली होती. या आवर्तीसारणीत नंतर अनेक बदल होत गेले. सातव्या आवर्तात एकूण चार मूलद्रव्यांची भर यात डिसेंबर २०१५ मध्ये पडली आहे. २०१६ अखेरीस त्यात एकूण ११८ मूलद्रव्यांची नोंद झाली आहे.