अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. महाराष्ट्राची सांस्कृतिक पंरपरा असलेल्या बैलगाडा शर्यतीला विशेष अटींसह परवानगी दिल्याचेही जावडेकर यांनी जाहीर केले.
गेल्या १०-१५ वर्षांपासून प्रलंबित असलेला शिव स्मारकास मंजुरीचा मुद्दा  निकाली निघाला आहे.
बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामागे बैलांना क्रूर वागणूक दिली जात असल्याचा संदर्भ होता, मात्र बैलगाडा शर्यत महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. त्यात क्रूरता नाही, त्यामुळे या शर्यतीला सशर्त परवानगी दिल्याचे जावडेकर म्हणाले.
बैलगाडा शर्यतीवरील बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणारे शिवसेना खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी आनंद व्यक्त केला.