चंदिगढ येथे डिस्कोथेकमधील मुलींच्या पहेरावर कडक निर्बंध लादण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबले आहे. कोणत्याही डिस्कोथेकमध्ये स्त्रियांनी तोकडे कपडे घालून जाण्यास चंदीगढ प्रशासनातर्फे पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. स्त्रियांनी डिस्कोथेकमध्ये तोकडे कपडे परिधान करून जाणे अथवा गैरवर्तन करणे आता खपवून घेतले जाणार नसल्याचे प्रशासनाने ठरवले आहे. ‘कंट्रोलिंग ऑफ प्लेसेस ऑफ पब्लिक अॅम्यूजमेंट २०१६’ च्या धोरणांतर्गत डिस्कोथेकमधील स्त्रियांच्या कपडे परिधान करण्यावर प्रशासनाने काही नियम घातले आहेत. १ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या या धोरणात डिस्कोथेकच्या वेळेतदेखील मर्यादा घालण्यात आल्या आहेत. रात्री २ वाजेपर्यंत चालणारे डिस्कोथेक आता रात्री १२ वाजेपर्यंतच उघडे राहू शकतात.
अनेक तरुणांनी या नियमांबाबत नाराजी जाहीर केली असली तरी चंदिगढ प्रशासन याची कडक अंमलबजावणी करणार आहे. डिस्कोथकमधील स्वैराचारामुळे अशा ठिकाणी समाजातील विघातक शक्तींना खतपाणी मिळत असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले.