चंद्राबाबू नायडू यांचा आरोप; वायएसआर काँग्रेसकडून खंडन

पीटीआय, अमरावती (आंध्र प्रदेश)

अमरावती हा पुराचा धोका असलेला परिसर असल्याचे दाखवून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकार राज्याची राजधानी अन्यत्र हलविण्याचा कट रचत असल्याचा आरोप तेलुगु देसमने केला आहे. मात्र वायएसआर काँग्रेसने हा आरोप सपशेल फेटाळला आहे.

तेलुगु देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केल्याने राजधानीच्या शहराच्या विकासाबद्दल सरकारच्या हेतूबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्याने नवा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

तथापि, राजधानी अन्यत्र हलविण्यात येणार असल्याच्या आरोपाचा वायएसआर काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अंबाती रामबाबू यांनी इन्कार केला आहे. राजधानी अन्यत्र हलविण्याबाबत आम्ही कधीही वक्तव्य केलेले नाही. आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात आम्ही अमरावतीला विरोध केला नाही अथवा मान्यताही दिलेली नाही, असे रामबाबू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अमरावती हा पुराचा धोका असलेला परिसर आहे आणि तो पाण्याखाली जाऊ नये यासाठी अनेक कालवे आणि बंधारे बांधावे लागतील, असे वक्तव्य मंगळवारी महापालिका प्रशासनमंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे.

अमरावतीमधील जमिनीचा प्रकार पाहता तेथे बांधकामाचा खर्च नेहमीपेक्षा जास्त असेल आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा पडेल, असेही सत्यनारायण म्हणाले होते.  त्यावर चंद्राबाबू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.