‘चांद्रयान-२’ मोहीम आता अखेरच्या टप्प्यात आहे. यानातील ‘विक्रम’ हे लँडर (चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवला जाणारा भाग) ऑर्बिटरपासून सोमवारी यशस्वीपणे विलग झाले. यामुळे आता सर्वाचे लक्ष ७ सप्टेंबरकडे लागले आहे.
सुमारे एक तासाच्या उत्कंठावर्धक प्रयत्नानंतर ‘विक्रम’ हे लँडर सोमवारी दुपारी सव्वा वाजता मूळ यान म्हणजे ऑर्बिटरपासून वेगळे झाले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सूत्रांनी दिली. लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी दोन प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी आधी त्याचा वेग कमी करत न्यावा लागेल, नंतर ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. लँडरला भारतीय अवकाश कार्यक्रमाचे प्रणेते विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ७ सप्टेंबरला रात्री १.५५ वाजता उतरणार आहे. ते उतरवण्याआधीचा पंधरा मिनिटांचा थरार महत्त्वाचा आहे. त्यातून लँडर अलगदपणे चांद्रभूमीवर उतरले तर ती भारताची मोठी कामगिरी असेल. त्यानंतर त्यातून प्रज्ञान हे रोव्हर बाहेर येईल, त्यासाठी चार तासांचा कालावधी लागेल.
रोव्हर बाहेर आल्यानंतर त्यावरील वैज्ञानिक उपकरणे कार्यान्वित होणार असून, ती चंद्रावरील माती आणि अन्य बाबींचे परीक्षण करतील. लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास अशी मोहीम साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.