भारत पहिल्या प्रयत्नात चंद्रावर यान उतरवण्यात अपयशी ठरला असला तरी चांद्रयान-२ मोहिम फसली असे म्हणता येणार नाही. कारण चांद्रयान-२ मधील ऑर्बिटर अजूनही कार्यरत असून तो चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत आहे. या ऑर्बिटरनेच लँडरचा फोटो इस्रोला पाठवला असून त्याचे विश्लेषण आता सुरु आहे. या मोहिमेतील अखेरचा १५ मिनिटांचा काळ अत्यंत खडतर होता. शेवटच्या टप्प्यात लँडरचा स्पीड आवश्यक गतीपेक्षा जास्त असल्यामुळे तो चंद्राच्या पृष्ठभागावर धडकला असण्याची शक्यता आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना लँडरचा जमिनीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तो पर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होते.
हे मिशन पूर्णपणे फसलेले नाही कारण चांद्रयान-२ तीन भागांमध्ये होते. ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर. चांद्रयान-२ २२ जुलैला श्रीहरीकोट्टा येथून अवकाशात झेपावल्यानंतर २ सप्टेंबरपर्यंत ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर एकत्र होते. २ सप्टेंबरला चंद्राच्या अपेक्षित कक्षेत पोहोचल्यानंचतर लँडर आणि रोव्हर ऑर्बिटरपासून वेगळे झाले. विक्रम लँडरचे लँडिंग फसले असले तरी ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत आहे. ऑर्बिटरमध्ये जी उपकरण बसवलेली आहेत त्याद्वारे जास्तीत जास्त वैज्ञानिक चाचण्या केल्या जाणार आहेत. चंद्रावर पाण्याचे पुरावे शोधण्याचा प्रयत्नही त्यामध्ये असेल. लँडर आणि रोव्हर आयुष्यच १४ दिवसांचे होते. पण ऑर्बिटर वर्षभर कार्यरत राहणार होता. आता त्यामध्ये असलेल्या इंधनामुळे तो आणखी सात वर्ष काम करेल असे इस्रोने सांगितले आहे. त्यामुळे मिशनसंबंधी ८० ते ९० टक्के माहिती ऑर्बिटरकडून प्राप्त होऊ शकते. त्याला काहीही झालेले नाही ही चांगली बाब आहे.
लँडिंगच्यावेळी नेमकं काय घडलं?
लँडिंगच्यावेळी नेमकी काय चूक घडली ते अजून स्पष्ट झालेलं नाही. पण नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला तेव्हा लँडरचा वेग प्रतिसेकंद ५० ते ६० मीटर होता. सेफ लँडिंगसाठी प्रतिसेकंद दोन मीटरचा वेग आवश्यक होता. प्रतिसेकंद पाच मीटर वेगाने लँडिंग झाले तरी तो धक्का सहन करण्याच्या दृष्टीने विक्रमची रचना करण्यात आली होती. पण लँडिंगच्यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त वेग असल्यामुळे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर धडकले असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये लँडर आणि त्यातल्या उपकरणांचे नुकसान झालेले असू शकते. विक्रमच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झालं नसल्याचं इस्रोच्या अध्यक्षांनीही मान्य केलं आहे.
इस्रोचे वैज्ञानिक पुढचे १४ दिवस लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. लँडरला शोधून त्याच्याशी संपर्क साधणे हे त्यावेळी नेमकं काय घडलं हे शोधून काढण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे. लँडरशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी पुढचे दोन आठवडेच हातात आहेत कारण त्यानंतर चंद्रावर रात्र सुरु होईल. चंद्रावरचा एक अख्खा दिवस पृथ्वीवरच्या चौदा दिवसांबरोबर आहे. चंद्रावर रात्रीच्यावेळी कडाक्याचा थंडावा असतो त्यावेळी लँडरमधील उपकरण निकामी झालेली असू शकतात. कारण लँडर आणि रोव्हरची डिझाईन १४ दिवस काम करण्याच्या दृष्टीनेच करण्यात आली होती.