ईशान्य मोसमी पावसामुळे चेन्नईत पूर आला आहे. कमी पावसामुळे हवालदिल झालेल्या महाराष्ट्राला या पूराचे नवल वाटत आहे. अर्थव्यवस्थेला तोलून धरणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची दवंडी वर्षभर फिरत असते; मात्र तामिळनाडूच्या एकूण पावसातील अर्धावाटा आणि दक्षिण भूभागातील पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असलेला ईशान्य मोसमी पाऊस मात्र काहीसा दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळेच या पावसाविषयी..

ईशान्य मोसमी..
वर्षांच्या विशिष्ट कालावधीत वाऱ्यांची दिशा बदलत असते. या बदलणाऱ्या दिशेमुळेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे ऋतू अनुभवता येतात. मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य दिशेकडून भारतात वारे येण्यास सुरुवात होते. हे वारे सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात आणि त्यामुळे पडणाऱ्या पावसाला नैऋत्य मोसमी पाऊस म्हणतात. हीच स्थिती ईशान्य मोसमी पावसाबाबत घडते. सप्टेंबरमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस वाऱ्यांच्या दिशेत झालेल्या बदलामुळे निरोप घेतो. या काळात वाऱ्यांची दिशा बदलून उत्तर- ईशान्येकडून वारे दक्षिण- वायव्येकडे वाहू लागतात. हे वारे कोरडे असतात. मात्र बंगालच्या उपसागरात या वाऱ्यांसोबत बाष्पही दक्षिणेकडचा रस्ता धरते. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडूत भरपूर पाऊस पडतो. याशिवाय केरळ, कर्नाटकातही सरी येतात. या पावसाला उत्तर- मोसमी म्हणूनही ओळखले जाते.

महत्त्व
या पावसामुळे देशाच्या दक्षिण टोकाकडील तामिळनाडूत भरपूर पाणी मिळते. वेधशाळेच्या अधिकृत आकडेवारीनुसार संपूर्ण तामिळनाडूमधील एकूण पावसाच्या ४८ टक्के पाऊस हा ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. राज्याच्या किनारी प्रदेशात तर एकूण पावसाच्या तुलनेत ६० टक्के वाटा ईशान्य मोसमी पावसाचा असतो.

पावसाचे आगमन आणि वैशिष्टय़

२० ऑक्टोबरच्या पुढे मागे आठवडाभर ईशान्य पावसाला सुरुवात होते. (यावर्षी २८ ऑक्टोबर रोजी पावसाला सुरुवात झाली. सर्वात लवकर सुरुवात ११ ऑक्टोबर २००६ रोजी झाली होती तर सर्वात उशीर २ नोव्हेंबर १९९२ व २००० मध्ये झाला होता ). आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पावसाचा प्रभाव वाढला की ईशान्य मोसमी पावसाला सुरूवात झाल्याचे वेधशाळेकडून जाहीर केले जाते. नैऋत्य मोसमी पाऊस निरोप घेताना दक्षिणेच्या राज्यात साधारणत दुपारनंतर ते रात्रीपर्यंत पाऊस पडतो तर ईशान्य मोसमी पाऊस हा रात्रीपासून पहाटेपर्यंत पडतो. मात्र किनाऱ्याजवळ वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यास (सध्या अशी स्थिती आहे.) दिवसभर पाऊस सुरू राहतो. त्यातही हा पाऊस टप्प्याटप्प्याने पडतो व चार दिवसांपेक्षा अधिक काळ सलग पडत नाही. तसेच नैऋत्य पावसाप्रमाणेच या पावसातही कोरडे दिवस किंवा पाऊस कमी पडण्याचे दिवस असतात.

 

दक्षिण भागात पडलेल्या पावसाची नोंद ईशान्य मोसमी पावसाअंतर्गत धरली जाते. १९५१ ते २००० या काळात या पावसामुळे दक्षिण भागात सरासरी ३३२ मिमी पाऊस पडला. तामिळनाडूत ही सरासरी ४३८ मिमी, केरळमध्ये ४८१ मिमी, दक्षिण कर्नाटकात २१० मिमी तर आंधात ३२७ व रायलसीमामध्ये २१९ मिमी आहे. मात्र दरवर्षी सरासरीपेक्षा खूप कमी- अधिक प्रमाणात पाऊस पडतल्याचे दिसून येते.