जागतिक व्यासपीठावर भारताने खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित असताना  भारतीय परराष्ट्र धोरणाला सिद्धातांशी बांधून ठेवणे शक्य नाही. वेगाने बदलणाऱ्या जगात हे धोरण वेगवानच असले पाहिजे, असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

‘बियाँड द दिल्ली डोगमा : इंडियन फॉरेन पॉलिसी इन चेंजिंग वर्ल्ड’ या विषयावर दी इंडियन एक्स्प्रेस समूहाने आयोजित केलेल्या चौथ्या रामनाथ गोएंका स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. सध्या आपण बदलाच्या एका टोकावर आहोत. अधिक आत्मविश्वासाने ध्येयांचा पाठलाग करावा लागतो आणि विरोधाभासांनाही तोंड द्यावे लागते. जोखीम पत्करल्यानेच महत्त्वाकांक्षा पूर्ण होतात, असेही जयशंकर यांनी सांगितले.

जगातील अग्रगण्य शक्ती होण्याची इच्छा असलेला देश सीमावाद, अंतर्गत वादामुळे तशी अपेक्षा करू शकत नाही. त्याचबरोबर बदलत्या जगात तो सिद्धान्तांनाही चिकटून राहू शकत नाही, असे जयशंकर म्हणाले. बदलत्या जगानुसार आपल्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये बदल  करणे आवश्यक आहे. भूतकाळात रमलो तर त्याचा भविष्यात लाभ होणार नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

अमेरिकेचा राष्ट्रवाद, चीनचा उदय, ब्रेग्झिटची कथा आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे फेरसंतुलन ही बदलाची नाटय़मय उदाहरणे असल्याचे जयशंकर म्हणाले.

जागतिक व्यासपीठावर भारताचे स्थान आश्वासक असले तरी १९६२ मध्ये चीनशी झालेल्संघर्षांमुळे भारताच्या जगातील स्थान नुकसान झाले, असे ते म्हणाले.

मोदींच्या निर्णयांची स्तुती

पाकिस्तानशी दोन हात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ठोस निर्णयांची जयशंकर यांनी स्तुती केली. भारताच्या प्रत्येक पंतप्रधानांनी पाकिस्तानशी दोन हात केल्याचे जयशंकर यांनी मान्य केले, मात्र आगीशी खेळणे अधिक महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. आरसेपमधून भारत बाहेर पडल्याबद्दल ते म्हणाले की, चुकीचा करार करण्यापेक्षा कोणताही करार न करणे चांगले असते.