जामा मशिदीवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी इंडियन मुजाहिद्दीनचा (आयएम) सहसंस्थापक यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असादुल्लाह अख्तर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
सप्टेंबर २०१० मध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात तैवानचे दोन पर्यटक जखमी झाले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती दया प्रकाश यांच्यासमोर सदर दोघांविरुद्धचा आपला अंतिम अहवाल सादर केला.
पाकिस्तानातील हॅण्डलरकडून यासिन भटकळ याला आदेश मिळाले होते. त्यानुसार राष्ट्रकुल स्पर्धाना सुरुवात होण्यापूर्वीच दहशतवादी हल्ले चढवा, अशा सूचना यासिनला देण्यात आल्या होत्या, असा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे.
राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सहभागी होण्यापासून परदेशांना परावृत्त करण्यासाठी कारस्थान रचण्यात आले होते, त्याचप्रमाणे भारत हा दुबळा आणि अशांत देश असल्याची प्रतिमा निर्माण करावयाची होती, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.