छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी ७५ टक्के मतदान झाले असून, ही आतापर्यंतची मतदानाची सर्वाधिक टक्केवारी असल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग हे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी मतदानाची टक्केवारी वाढल्याने सत्तारूढ पक्षाचे धाबे दणाणले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष धरमलाल कौशिक यांनी बिलहा मतदारसंघात मतदानाचा अधिकार बजावला. काँग्रेसचे सियाराम कौशिक यांचा २००८च्या निवडणुकीत धरमलाल यांनी पराभव केला होता. या निवडणुकीतही दोन्ही कौशिक आमनेसामने आहेत.
मतदानाचा दुसरा टप्पा शांततेत पार पडावा यासाठी एक लाखाहून अधिक सुरक्षारक्षक राज्यभर तैनात करण्यात आले होते. छत्तीसगडच्या मध्यवर्ती आणि उत्तरेकडील भागांत मतदान झाले असून, तेथे भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी ७२ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ७५ महिला उमेदवारही रिंगणात आहेत.
मतदानाच्या आजच्या टप्प्यात कौशिक, नऊ मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रामसेवक पाइकरा, विरोधी पक्षनेते रवींद्र चौबे आणि माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या पत्नी रेणू जोगी यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.