मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिझ सईद याच्यावर कारवाई करण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढत चालला आहे. हाफिझला सुखाने जगावयाचे असेल तर त्याला पाकिस्तानमधून अन्य देशांत हलवा, असा सल्ला चीनने पाकिस्तानला दिला आहे.

हाफिझला दुसऱ्या देशात हलविण्याबाबत पाकिस्तानने आता विचार करावा, असे चीनने म्हटले आहे. हाफिझ सध्या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय संस्थांच्या निशाण्यावर आहे.

गेल्या महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची बोओ फोरममध्ये भेट झाली. त्या वेळी जिनपिंग यांनी सईदला पश्चिम आशियामध्ये हलविण्याचा सल्ला दिला होता. सईदला पाकिस्तानातून हलविले तरच तो पुढील आयुष्य सुखाने जगू शकेल, असे चीनने म्हटले आहे.

‘द हिंदू’ या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, दोन्ही नेत्यांची सुमारे ३५ मिनिटे भेट झाली. त्यामध्ये काही वेळ हाफिझवर चर्चा झाली.

चीनच्या सल्ल्यानंतर अब्बासी यांनी हाफिझबाबत वरिष्ठ कायदेतज्ज्ञांसमवेत चर्चा केल्याचे वृत्त आहे. जुलै महिन्यात पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असून अब्बासी यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपणार आहे. त्यापूर्वी हाफिझला पाकिस्तानातून अन्यत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

तेवृत्त धक्कादायक, निराधार चीनचे स्पष्टीकरण

बीजिंग : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद याला पाकिस्तानातून पश्चिम आशियाई देशामध्ये हलविण्याचा सल्ला चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी पाकिस्तानला दिल्याचे माध्यमांनी दिलेले वृत्त धक्कादायक आणि निराधार असल्याचे स्पष्ट करून चीनने गुरुवारी त्या वृत्ताचे जोरदार खंडन केले. हाफिझ सईदवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रचंड दबाव येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या निकटच्या सहकाऱ्याने सांगितले की, चीनमध्ये गेल्या महिन्यात बोओ फोरम परिषदेच्या वेळी अब्बासी यांना क्षी जिनपिंग यांनी वरील सूचना केली. याबाबत माध्यमांनी दिलेले वृत्त धक्कादायक आणि पूर्णत: निराधार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. त्यापेक्षा अधिक भाष्य करण्यास परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने नकार दिला.