मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याच्याबाबत घेतलेली भूमिका ‘वस्तुस्थितीवर’ आधारित होती, तसेच ‘वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता’ या भावनेतून स्वीकारली होती, असे सांगून लख्वीविरुद्ध कारवाई करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघाकडे केलेल्या मागणीत अडथळा आणण्याच्या आपल्या कृतीचे चीनने एका प्रकारे समर्थन केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य म्हणून चीन १२६७ समितीपुढील प्रकरणे वस्तुस्थितीच्या आधारे, तसेच वस्तुनिष्ठता व निष्पक्षता यांना अनुसरून हाताळतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले.
रशियातील उफा येथे ब्रिक्स परिषदेसाठी गेलेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष झि जिनपिंग यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात चुनयिंग यांनी ही माहिती दिली. या दोन नेत्यांदरम्यानची बोलणी ‘रचनात्मक आणि समावेशक’ होती, असे सांगतानाच, चीनने लख्वीच्या मुद्दय़ावर भारत व इतर पक्षांशी चांगला संवाद राखला आहे, असे त्या म्हणाल्या.
भारताच्या दहशतवादाबाबतच्या चिंतेविषयी त्या म्हणाल्या की, भारत व चीन हे दोघेही दहशतवादाचे बळी आहेत हे मी सांगू शखते. चीनचा सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध असून, दहशतवादाबाबत आंतरराष्ट्रीय सहकार्याचे समन्वयन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2015 12:25 pm