अण्वस्त्रांची संख्या कमी करण्यासंदर्भात अमेरिका, रशिया बरोबर त्रिपक्षीय शस्त्र नियंत्रण वाटाघाटींमध्ये सहभागी व्हायला चीनला आवडेल. पण आज आमच्याजवळ जितकी अण्वस्त्रे आहेत, तितकी अमेरिका त्यांच्या अण्वस्त्रांची संख्या कमी करायला तयार असेल तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे बुधवारी चीनच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

एक नवीन सुरुवात करण्यासाठी अमेरिकेकडून त्रिपक्षीय चर्चेमध्ये सहभागी होण्याचे चीनला वारंवार आवाहन करण्यात येत आहे. अमेरिका आणि रशियामधील अण्वस्त्र करार पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. “शीत युद्धाच्या काळातील दोन महासत्तांबरोबर वाटाघाटीमध्ये सहभागी होण्यास चीनला अजिबात रस नाही. चीनच्या तुलनेत अमेरिकेकडे २० पट जास्त अण्वस्त्र आहेत” असे फ्यू काँग म्हणाले. ते चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या शस्त्र नियंत्रण विभागाचे प्रमुख आहेत.

“अमेरिका चीन इतकी अण्वस्त्रांची संख्या करणार असेल तर मी तुम्हाला खात्री देतो, दुसऱ्यादिवशी चीन आनंदाने त्या वाटाघाटींमध्ये सहभागी होईल. पण असे घडणार नाही, हे आम्हाला माहित आहे” असे फ्यू काँग म्हणाले. “अमेरिका चीनला अण्वस्त्रांची संख्या कमी करण्यासाठी त्रिपक्षीय वाटाघाटींमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत असला तरी तो लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या डावपेचांचा एक भाग आहे” असे फ्यू काँग म्हणाले.

चीन-अमेरिका व्यापार वाद, करोना व्हायरस यामुळे सध्या चीन-अमेरिका संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दक्षिण चीन सागरातील चीनच्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी अमेरिकेने या भागात युद्धनौका सुद्धा तैनात केल्या आहेत. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर चीनने भारताबरोबर युद्धजन्य स्थिती निर्माण केल्यानंतर अमेरिकेने जाहीरपणे भारताला मदत करण्याचे संकेत दिले. भारताने चीनच्या आक्रमकतेला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिल्यानंतर चीन नरमला आता पूर्व लडाखमधील तणाव असलेल्या भागातून चिनी सैन्य मागे फिरत आहे.