पाकिस्तान आणि चीन या दोन देशांमधील मैत्रीचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. पाकिस्तानला आणखी दोन अणुभट्ट्या विकण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. चीनच्या या निर्णयावर भारताने राजकीय आणि अधिकाऱय़ांच्या पातळीवर आक्षेप नोंदविला आहे. त्याचबरोबर अणु पुरवठादार देशांच्या गटामध्येही याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून भारत आक्षेप नोंदवतो आहे.
संपूर्णपणे चिनी बनावटीच्या ११०० मेगावॉट क्षमतेच्या अणुभट्टीची पहिल्यांदाच चीन परदेशामध्ये विक्री करणार आहे. या अणुभट्टीच्या निर्मितीमुळे चीनची या क्षेत्रातील ताकद वाढली आहे. पाकिस्तानातील कराचीजवळ ही अणुभट्टी बसविण्यात येणार असून, त्यासाठी ९.६ अब्ज डॉलर इतका खर्च येणार आहे. चीन पाकिस्तानला अणुभट्ट्या विकणार असल्याबद्दल गेल्या काही वर्षापासून चर्चा सुरू होती. मात्र, चीनमधील राष्ट्रीय अणु महामंडळ लिमिटेडने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात पाकिस्तानसोबत प्राथमिक करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर भारताने या व्यवहारासंदर्भात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चिंता व्यक्त करण्यास सुरूवात केली.
गेल्या काही महिन्यांपासून भारत चीनसोबतच्या उच्चस्तरिय बैठकांमध्ये हा विषय उपस्थित करतो आहे. त्याचसोबत राजकीय पातळीवरही हा विषय मांडण्यात आल्याचे समजते.
नागरी आणि लष्करी या दोन्ही कारणासाठी अणुऊर्जाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करण्यासंदर्भात अद्याप पाकिस्तानने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे चीनने पाकिस्तानला अणुभट्ट्या देण्याचा भारताच्या सुरक्षेवर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी चिंता भारताने चीनकडे व्यक्त केली आहे.