राष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या हालचालींवर झेनुआ कंपनीची पाळत

पी वैद्यनाथन अय्यर, जय मझुमदार, कौनैन एम शेरीफ/ दि इंडियन एक्स्प्रेस

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर चीनस्थित एक मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी पाळत ठेवून असल्याची माहिती ‘दि इंडियन एक्स्प्रेस’च्या हाती आली आहे.

चीनच्या आतापर्यंतच्या कायापालटात आणि ‘हायब्रीड वॉरफेर’मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारी ‘आद्य संस्था’ असे म्हणवून घेणाऱ्या या कंपनीचे नाव ‘झेनुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड’ असे आहे. चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या या कंपनीचे मुख्यालय शेन्झेन शहरात आहे. ही कंपनी केवळ महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांवरच नजर ठेवून नाही, तर अनेक राजकीय संस्था आणि उद्योगांवरही ती हेरगिरी करीत आहे. राजकारण ते उद्योग आणि न्यायव्यवस्था ते माध्यम या यंत्रणांवरही ही कंपनी हेरगिरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. इतकेच नव्हे तर भारतातील सर्व क्षेत्रांतील गुन्हेगारांचा तपशीलही या कंपनीकडे आहे.

राजकीय व्यक्तींव्यतिरिक्त संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह १५ माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दलप्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, भारताचे महालेखा परीक्षक (कॅग) जी. सी. मुर्मू यांच्या हालचालींची नोंदही ‘झेनुआ’ कंपनी ठेवत असल्याची माहिती हाती आली आहे. त्याचबरोबर उद्योगपती रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासह ‘भारत पे’ या ‘अ‍ॅप’चे संस्थापक निपुण मेहरा आणि ‘अर्थब्रिज’चे अजय त्रेहान आदी नवउद्यमींवरही ही चिनी कंपनी हेरगिरी करीत असल्याचे आढळले आहे.

राजकारण आणि प्रशासकीय यंत्रणांतील केवळ प्रभावशाली व्यक्तींवरच नव्हे तर जवळपास सर्वच महत्त्वाच्या भारतीयांवर ‘झेनुआ’ कंपनी लक्ष ठेवून आहे. त्यांत महत्त्वाच्या पदांवरील अधिकारीवर्ग, न्यायमूर्ती, शास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक, पत्रकार, कलाकार, खेळाडू, आध्यात्मिक गुरू आणि सामाजिक कार्यकर्ते यांचाही त्यांत समावेश आहे. त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि अमली पदार्थ, सोने किंवा वन्य प्राण्यांच्या तस्करीतील गुन्हेगारांवरही ‘झेनुआ’ची नजर आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव असताना ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने उघडकीस आणलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे. ‘झेनुआ’ कंपनीने आपण चिनी गुप्तचर, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांबरोबर काम करीत असल्याचा दावा केला आहे.

दोन महिने उत्खनन

‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठय़ातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी उत्खनन केले. माहिती काढण्यासाठी ‘बीग डाटा टूल्स’चा वापर करण्यात आला. या माहितीसाठय़ाला कंपनीने ‘ओव्हरसीज की इन्फॉर्मेशन डाटाबेस’ (ओकेआयडीबी) असे शीर्षक दिले आहे. या माहितीसाठय़ात शेकडो नोंदी आहेत. त्यातून भारताबद्दलची माहिती शोधण्यात आली. ही माहिती अस्पष्ट नोंदींमध्ये चिन्हांकित केलेली नसल्याचे आढळले. अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशांविषयीच्या माहितीचा साठाही कंपनीने केला आहे. कंपनीने ही माहिती कंपनीशी संबंधित असलेल्या संशोधकांच्या जाळ्यामार्फत जमविली आहे.

ही माहिती शेन्झेनमध्ये अध्यापन केलेल्या व्हिएतनाममधील प्राध्यापक ख्रिस्तोफर बाल्डिंग यांच्यामार्फत सूत्रांनी काही वृत्तसंस्थांना दिली. त्यात दि इंडियन एक्स्प्रेस, द ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ या वृत्तपत्रांचा समावेश आहे.

दिल्लीतील चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांना ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने काही प्रश्न विचारले होते. त्यांचे उत्तर देताना तेथील सूत्रांनी, ‘‘चीनने कोणत्याही कंपनीला किंवा व्यक्तींना कोणत्याही देशाची अंतर्गत डिजिटल आणि गोपनीय माहिती जमवण्यास किंवा पुरवण्यास सांगितले नव्हते. चीन सरकारने कोणत्याही देशाचे कायदे धुडकावून मागच्या दाराने माहिती काढण्यास कुणालाही सांगितलेले नाही’’, असे स्पष्ट केले. तसेच परदेशात व्यापार-व्यवसाय करताना त्या-त्या देशांतील कायदे आणि नियमांशी बांधिल राहण्याच्या सूचना चीन सरकारमार्फत चिनी कंपन्यांना देण्यात येतात, असेही दूतावासातील सूत्रांनी स्पष्ट केले.

..आणि संकेतस्थळच ‘बेपत्ता’

झेनुआ कंपनी २०१८च्या एप्रिलमध्ये स्थापन करण्यात आल्याची नोंद आहे. कंपनीची जगभरात २० केंद्रे आहेत. चीन सरकार आणि चिनी लष्कर हे कंपनीचे ‘ग्राहक’ असल्याची नोंद आहे. १ सप्टेंबरला कंपनीच्या इमेल पत्त्यावर एक प्रश्नावली पाठवण्यात आली होती. त्यानंतर म्हणजे ९ सप्टेंबरला कंपनीने आपले संकेतस्थळच माहिती महालाजातून (इंटरनेट) काढून टाकले. प्रतिनिधीने ‘झेनुआ’कंपनीच्या शेन्झेन येथील मुख्यालयात जाऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर एक प्रश्नावली ठेवली होती. त्या प्रश्नावलीत ‘इंडियन एक्स्प्रेस’ने काढलेल्या प्रश्नांचाही समावेश होता. पंरतु, हे प्रश्न कंपनीच्या व्यापार गुपिताशी संबंधित असल्याने त्यांची उत्तरे देणे अयोग्य आहे,’ असे उत्तर कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिले होते.

*काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबीय

* विविध राज्यांचे मुख्यमंत्री पंजाब-अमरिंदर सिंग, ओदिशा- नवीन पटनायक, पश्चिम बंगाल- ममता बॅनर्जी, राजस्थान- अशोक गेहलोत, मध्य प्रदेश -शिवराज सिंह चौहान.

* केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, पीयूष गोयल

*चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल

*सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू

*हिंदू समूहाचे अध्यक्ष एन. रवी

*झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी

*इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई

*पंतप्रधान कार्यालयातील माजी माध्यम सल्लागार संजय बारू

*दि इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य संपादक राज कमल झा