चिनी वैज्ञानिकांनी अखेर ‘एच ७ एन ९’ या बर्ड फ्लू विषाणूमुळे होणाऱ्या इन्फ्लुएंझावर लस शोधून काढली आहे. मार्चपासून या रोगाने चीनमध्ये ४५ लोक मरण पावले आहेत. चीनच्या नॅशनल इन्फ्लुएंझा सेंटरचे संचालक शू युएलाँग यांनी सांगितले, की चिनी वैज्ञानिकांनी तयार केलेली ही पहिली इन्फ्लुएंझा लस आहे. या लशीमुळे फ्लूच्या ‘एच ७ एन ९’ या विषाणूच्या नव्या प्रजातींशी मुकाबला करण्याचे एक साधन उपलब्ध झाले आहे शिवाय त्यामुळे या रोगाचा प्रसारही कमी होईल असे ते म्हणाले.
ही लस फर्स्ट अ‍ॅफिलिएटेड हॉस्पिटलने स्कूल ऑफ मेडिसिन ऑफ झेजियांग युनिव्हर्सिटी, हाँगकाँग युनिव्हर्सिटी व चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर फूड अँड ड्रग कंट्रोल व चायनीज अ‍ॅकडमी ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थाच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आली आहे. चीननध्ये ‘एच ७ एन ९’ या बर्ड फ्लू विषाणूचा संसर्ग मार्चमध्ये झाला. आतापर्यंत त्यामुळे १३६ लोक मरण पावले आहेत, अशी माहिती नॅशनल हेल्थ अँड फॅमिली प्लानिंग कमिशन या संस्थेने दिली आहे. संसर्ग झालेल्या लोकांपैकी ४५ जण मरण पावले अशून मृत्यू दर हा ३३.१ टक्के आहे. इतर देशात अजून याचा प्रादुर्भाव फारसा झालेला नाही. या बर्ड फ्लूमुळे चीनमधील कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनियरिंगचे ली लानजुआन यांनी सांगितले, की आमच्या पथकाने ‘एच ७ एच ९’ विषाणू वेगळा केला व तो तीन एप्रिल रोजी एका संसर्गित रुग्णाच्या घशातून घेतलेल्या नमुन्यात सापडला होता. लस तयार करताना जगात ज्या रिव्हर्स जेनटिक्स व जेनेटिक रिअसॉर्टमेंट पद्धती वापरतात त्यांचा वापर करून ही लस तयार केली आहे नंतर ही लस सुरक्षित सिद्ध झाली आहे. सध्या या लसीचे इन्स्टिटय़ूट ऑफ लॅबोरेटपरी अ‍ॅनिमल सायन्सेस ऑफ चायनीज अ‍ॅकेडमी ऑफ मेडिकल सायन्सेस येथे सस्तन प्राण्यांवर प्रयोग चालू आहेत. टायनयुआन बायो फार्मास्युटिकल कंपनी लिमिटेड कंपनीने लसीचे उत्पादन करण्यात स्वारस्य दाखवले आहे. विज्ञान व शिक्षण विभागाचे लिउ डेंगफेंग यांनी सांगितले, की तपमान कमी होईल तसे या रोगाचा प्रादुर्भाव वाढत जाईल व आणखी नवीन रुग्ण दिसून येतील.