यंदाच्या प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीत होणाऱ्या इंडियन एअर फोर्सच्या फ्लायपास्टमध्ये चिनुक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स सुद्धा सहभागी होणार आहेत. फ्लायपास्टमध्ये इंडियन एअर फोर्सची फायटर विमाने, हेलिकॉप्टर्स हवाई कौशल्य दाखवतात. अमेरिकन बनावटीची चिनुक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स गेल्यावर्षी इंडियन एअर फोर्समध्ये दाखल झाले. ‘अपाचे’ हे मिसाइलने सुसज्ज असलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे. युद्ध काळात दुर्गम भागात शस्त्रास्त्र आणि अन्य साहित्य पोहोचवण्यासाठी चिनुक हे अत्यंत उपयोगी हेलिकॉप्टर्स आहे.

काय आहे अपाचे हेलिकॉप्टरचं वैशिष्टय ?
अपाचे हेलिकॉप्टर्सची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. परिणामी भारतीय हवाई दलाची क्षमता आणि ताकद आता कैकपटीने वाढली आहे. जवळपास 280 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण घेणारं हे हेलिकॉप्टर त्याच्या डिझाइनमुळे रडारमध्ये सहजपणे दिसत नाही. जवळपास पावणे तीन तासांपर्यंत हवेत राहू शकणाऱ्या या हेलिकॉप्टरने दशहतवाद्याचं तळ असो किंवा लढाऊ टँक सर्व उद्ध्वस्त करता येणं शक्य आहे. शत्रूच्या हद्दीत घुसून मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये असते. अपाचे एएच-६४ई या जातीचे हे लढाऊ हेलिकॉप्टर अमेरिकी लष्कर वापरतं. जगातील हे सर्वात अत्याधुनिक आणि मल्टी-रोल कॉम्बॅट तसंच शक्तिशाली लढाऊ विमान आहे. 1975 मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली होती तर 1986 मध्ये ही हेलिकॉप्टर्स पहिल्यांदा युद्धभूमीवर वापरण्यात आली होती. अमेरिकेशिवाय नेदरलॅंड्स ,इजिप्त ,इस्राइलच्या ताफ्यातही अपाचे विमानं आहेत.

काय आहे चिनुक ?
‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स सियाचीन आणि लडाख अशा ठिकाणी वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. बोइंग सीएच-४७ चिनुक हे अमेरिकी सैन्यदलांच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. मागे आणि पुढील अशा दोन्ही बाजूंना असलेले आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे त्याचे दोन मोठे रोटर (पंखे) हे त्याचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे ते सहज ओळखता येते.

अमेरिकी सैन्य दलांना १९५६ साली जुन्या सिकोस्र्की सीएच-३७ ही मालवाहू हेलिकॉप्टर बदलण्यासाठी नवे हेलिकॉप्टर हवे होते. बऱ्याच विचारविनिमयानंतर व्हटरेल मॉडेल ११४ किंवा वायएचसी-१बी नावाचे हेलिकॉप्टर स्वीकारण्याचे ठरले. या हेलिकॉप्टरचे पहिले उड्डाण २१ सप्टेंबर १९६१ रोजी झाले. व्हटरेल ही कंपनी १९६२ साली बोइंगने खरेदी केली. त्यानंतर या हेलिकॉप्टरचे नाव बोइंग सीएच-४७ ए चिनुक असे ठेवले गेले. ते ऑगस्ट १९६२ मध्ये अमेरिकी सैन्य दलांत दाखल झाले. त्यानंतर आजतागायत ४० वर्षांहून अधिक काळ ते १७ देशांच्या हवाई दलांत प्रभावीपणे कार्यरत आहे.