सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शामक दावर याच्याविरुद्ध कॅनडा येथील न्यायालयात लैंगिक छळाच्या आरोपाखाली दोन खटले दाखल करण्यात आले आहेत. येथील उत्तर व्हँन्कोयुवर भागात राहणाऱ्या पर्सी श्रॉफ आणि जिमी मिस्त्री यांनी ब्रिटीश कोलंबियाच्या सर्वोच्च न्यायालयात शामकविरोधातील तक्रार दाखल केली. बॉलीवूडचे अनेक चित्रपट आणि सोहळ्यांचा नृत्य दिग्दर्शक म्हणून शामक दावर इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. सूत्रांच्या माहितीनूसार शामक हा बराच काळ उत्तर व्हँन्कोयुवरमध्ये वास्तव्यास असतो आणि तेथील ‘व्हीआरआरपी’ या धार्मिक प्रशिक्षण गटाची सूत्रे सध्या त्याच्याकडे आहेत. सीबीसी न्यूज या वृत्तवाहिनीच्या माहितीनूसार, पर्सी श्रॉफ आणि जिमी मिस्त्री यांच्याकडून शामक गेली अनेक वर्षे आपला लैंगिक छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे आम्ही शामकच्या अकारण लैंगिक स्पर्शाचा सामना केला आहे. शामक हा आमच्या धार्मिक प्रशिक्षण संस्थेतील गुरू आहे आणि त्यामुळे आमच्या जीवनावर एकप्रकारे त्याचा हक्क आहे. मात्र, त्याने या सगळ्याचा गैरफायदा उचलल्याचे या दोघांनी सांगितले. शामकला देवाप्रमाणे मानून आम्ही त्याचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानत होतो. मी कायम त्याची स्तुती करत असे. मात्र, शामकने १६ वर्षांचा असल्यापासूनच मला लैंगिक छळासाठी तयार केले आणि आता तो त्याच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे पर्सी श्रॉफ याने सीबीसी या वृत्तवाहिनीला सांगितले. याशिवाय, शामक संस्थेतील तरूण मुलांबरोबर लैंगिक संबंध ठेवत होता. ही तरूण मुले तुझ्याकडे नृत्य आणि धार्मिकबाबतीत सल्ला मागण्यासाठी येतात तेव्हा, तू हा प्रकार थांबवला पाहिजेस, असे मी त्याला सांगितल्याचेही पर्सीने सांगितले.
मात्र, शामकने हे सर्व आरोप नाकारले असून हे दोन्ही नर्तक माझे चारित्र्य, प्रतिष्ठा आणि माझा संबंध असलेल्या संस्थेचे नाव बदनाम करण्यासाठी हा सर्व प्रकार करत असल्याचे सांगितले. त्यामुळे माझ्याविरुद्धचे खटले रद्द करण्यात यावेत, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली आहे.