करोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांना नागरिकांचाही हातभार लागावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘नागरिक साहाय्य आणि आपत्कालीन स्थिती निवारण निधी’ची घोषणा केली.

या निधीतून (पीएम-केअर्स फंड) निरोगी भारताचे दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर व्यक्त केला आहे. या नव्या सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त निधीचे अध्यक्ष पंतप्रधान असतील, तर संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री सदस्य असतील.

देणगी कुठे देणार?

http://www.pmindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, नेटबँकिंग आणि आरटीजीएस किंवा ‘एनईएफटी’द्वारे या निधीला देणगी देता येईल.

मदतीचा ओघ

* टाटा समूहाने देशात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांसाठी तब्बल दीड हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.

* अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या नागरिक निधीसाठी २५ कोटी देणगी देण्याची घोषणा केली.

* भाजपच्या सर्व खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी एक कोटी केंद्र सरकारच्या निधीस देण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. तर भाजपचे महाराष्ट्रातील सर्व आमदार एक महिन्याचे वेतन पक्षाच्या कोषात जमा करणार आहेत.

* राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार हे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणार आहेत.

* राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्याचे जाहीर केले आहे.