जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा (जेएनयू) विद्यार्थी असलेल्या उमर खालिदचा दिल्ली विद्यापीठाच्या रामजस महाविद्यालयात होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. उमर खालिदला रामजस महाविद्यालयामध्ये ‘आदिवासी भागांमधील हिंसा’ या विषयावरील परिसंवादासाठी निमंत्रित करण्यात आले होते. २१ फेब्रुवारीला हा कार्यक्रम होणार होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवारी या परिसंवादाला विरोध दर्शवला. यानंतर ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्त्यांकडे हाणामारी झाली. यामध्ये अद्याप तरी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

‘विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला,’ असे रामजस महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले आहे. याआधी मंगळवारी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना डेबलिन रॉय या विद्यार्थ्याने ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ४० ते ५० कार्यकर्ते कॅन्पसमध्ये घुसून उमर खालिदच्या विरोधात घोषणाबाजी केली. थोड्या वेळाने कार्यकर्ते हिंसक झाले आणि त्रास देऊ लागले,’ अशी माहिती दिली. ‘हल्ला करणाऱ्या पूर्ण सुरक्षा पुरवली जाते आणि पीडितांना हल्ल्यासाठी जबाबदार धरले जाते, ही आपल्या देशातील लोकशाही आहे,’ असे ट्विट उमर खालिदने परिसंवाद रद्द झाल्यावर केले.

२०१६ मध्ये अफजल गुरुसंबंधित कार्यक्रम आयोजित केल्यामुळे तीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये उमर खालिदचा समावेश होता. रामजस महाविद्यालयाने उमर खालिद आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेची माजी अध्यक्ष शेहला राशिदला परिसंवादाचे निमंत्रण दिले होते. शेहला राशिद विद्यार्थी संघटनेची माजी सदस्य आहे. विद्यार्थ्यांच्या अटकेविरोधात आंदोलन करण्यात शेहला राशिद आघाडीवर होती.