चार लॉकडाउन नंतरही देशात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. उलट दररोज करोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तामिळनाडूतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. तिथे करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

त्यामुळे राज्य सरकारने तामिळनाडूतील चार जिल्ह्यांमध्ये १९ जून ते ३० जून पर्यंत पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई, चेनगालपट्टू, थिरुवल्लूर आणि कांचीपूरम हे ते चार जिल्हे आहेत. अत्यावश्यक सेवा, रुगणालय, चाचणी लॅब आणि वैद्यकीय सेवांना निर्बंधांमधून वगळण्यात येईल. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- देशात करोनाचे थैमान सुरूच; २४ तासांत ३२५ मृत्यू, ११,५०२ नवे रुग्ण

विमान आणि ट्रेन सेवा प्रोटोकॉलनुसार सुरु राहिल. इमर्जन्सी सोडल्यास टॅक्सी आणि रिक्षांना रस्त्यावर अजिबात परवानगी नसेल. गाडयांचा वापर करु नका तसेच घरापासून दोन किलोमीटरच्या परिसरातूनच जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करा असे यंत्रणांनी आवाहन केले आहे. ३३ टक्के उपस्थितीसह सरकारी कार्यालये सुरु राहतील. पण कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कामावर येऊ नका असे सांगण्यात येईल. रविवारी तामिळनाडूत १,९७४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात ४४,६६१ जणांना करोनाची लागण झाली असून ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा- दिल्लीमध्ये पुन्हा लॉकडाउन नाही, केजरीवालांनी केलं स्पष्ट

दिल्लीमध्ये पुन्हा लॉकडाउन नाही
दिल्लीमध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढतेय तसेच करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात येऊ शकतो अशी चर्चा मागच्या दोन-चार दिवसांपासून जोरात सुरु आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

आपल्या टि्वटमधून अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाउन संबंधी सुरु असलेल्या चर्चांचे खंडन केले आहे. दिल्लीमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्याची कुठलीही योजना नाही. “दिल्लीमध्ये पुन्हा लॉकडाउन करणार? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये सुरु आहे. असा लॉकडाउन करण्याची आमची कुठलीही योजना नाही” असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.