News Flash

नितीशकुमार- लालूप्रसाद संबंधांत आणखी बिघाड

ल्या काही महिन्यांपासून लालू आणि नितीश यांच्यामधील विसंवाद वाढत चालल्याचे चित्र आहे

ल्या काही महिन्यांपासून लालू आणि नितीश यांच्यामधील विसंवाद वाढत चालल्याचे चित्र आहे

भाजपला ’नवा मित्रपक्ष’ लखलाभ असल्याच्या लालूंच्या टिप्पणीने नव्याने चर्चा

सुमारे एक हजार कोटींच्या बेनामी मालमत्तांप्रकरणी प्राप्तीकर खात्याने मंगळवारी देशभर २२ ठिकाणी छापे घातल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यातील आधीच अवघडलेले संबंध आणखी ताणल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ’नवा मित्रपक्ष भाजपला लखलाभ असो,’ या स्वतच्याच बोचऱ्या टिप्पणीनंतर नितीश यांच्यासोबतची महाआघाडी मजबूत असल्याचा खुलासा लालूंना करावा लागला असला तरी त्यांच्यातील वाढत्या तणावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लालूंना धक्का देणारी मंगळवार सकाळची ही कारवाई झाली ती नितीशकुमारांनी सोमवारी केलेल्या बोलक्या टिप्पणीने. ’लालूंविरुद्ध पुरावे असतील तर भाजपने न्यायालयात जावे. त्यांच्यावरील आरोपांशी राज्य सरकारचा संबंध नाही. आम्ही चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपची केंद्रात सत्ता आहे. हवे असेल तर त्यांनी पहावे,’ असे ते म्हणाले होते. योगायोगाने दुसऱ्या दिवशी सकाळीच छापे पडल्याने लालू एकदम बिथरले आणि ’नवा मित्रपक्ष भाजपला लखलाभ असो. हा लालू घाबरणारा नाही. मला चिरडून टाकाल तर बिहारमधून लाखो लालू उभे राहतील,’ असे आक्रमक ट्विट त्यांनी केले. लालूंनी नव्या मित्रपक्षाचे नाव घेतले नसले तर त्यांचा रोख नितीशकुमारांकडे असल्याचे बहुतेकांना वाटले. कारण ही कारवाई नितीशकुमारांच्या इशाऱ्याबरहुकूम झाल्याचे राष्ट्रीय जनता दलाच्या एका गटाला वाटते आहे. पण, आपल्या विधानाने आणखीनच संभ्रम निर्माण झाल्याचे लक्षात येताच लालूंनी पुन्हा सावरून घेणारे ट्विट केले. ’माझ्या यापूर्वीच्या ट्विटने फार आनंदीत होऊ नका. आमची (नितीशकुमारांबरोबरील) महाआघाडी एकदम मजबूत आहे. आता तर समविचारी अनेक मित्रांबरोबर आघाडी होईल. सरकारी दमनयंत्राला आणि सरकारच्या चमच्यांना मी घाबरत नाही,’ असे त्यांनी नमूद केले. पण तोपर्यंत जायचा तो संदेश गेला होता. इकडे दिल्लीमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मनोजकुमार झा यांनी ’नवे मित्रपक्ष’ म्हणजे सीबीआय, प्राप्तिकर खाते, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि चमचेगिरी करणारी माध्यमे असे लालूंना म्हणायचे असल्याची मखलाशी केली.

गेल्या काही महिन्यांपासून लालू आणि नितीश यांच्यामधील विसंवाद वाढत चालल्याचे चित्र आहे. त्यातच नितीश हे पुन्हा भाजपकडे सरकत असल्याच्या दबक्या आवाजातील चच्रेने संशयाचे वातावरण आहे. नोटाबंदीचे त्यांनी केलेले समर्थन, भाजपच्या विजयासाठी ईव्हीएममधील कथित घोटाळ्यांना दोषी धरण्यास दिलेला नकार यांच्यामुळेही दोघांमधील संबंध बिघडत चालल्याचे मानले जाते. लालूंनी २७ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या महामेळाव्यात सहभागी होण्याबद्दल अजूनही नितीशकुमारांनी शब्द दिलेला नाही. दुसरीकडे, भाजपकडून पुन्हा नितीशकुमारांना साद घातण्यात आली आहे. लालूंसारख्या भ्रष्ट व्यक्तीबरोबर राहण्याऐवजी नितीशकुमारांनी ’घरवापसी’ करण्याची टिप्पणी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, रामविलास पासवान आदींनी केली.

* भाजपसोबतची दोन दशकांची युती मोडल्यानंतर नितीशकुमारांनी आपले कट्टर राजकीय शत्रू लालू आणि काँग्रेसशी महाआघाडी करून २०१५ मध्ये मोदी आणि अमित शहा या जोडगोळीचा बिहारमध्ये दणदणीत पराभव केला होता.

* २४३ जणांच्या विधानसभेत लालूंकडे ८०, नितीशकुमारांकडे ७१ आणि काँग्रेसकडे २७ आमदार आहेत. बहुमतासाठी १२२ जागांची गरज असताना महाआघाडीकडे १७८ आमदार आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) फक्त ५८ आमदार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 3:34 am

Web Title: complication between nitish kumar and lalu prasad yadav
Next Stories
1 ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वाचकांची भूकंपग्रस्त नेपाळला मदत
2 वाढत्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये ३८ हजार लोकांचा मृत्यू
3 केंद्र सरकारविरोधात पुढील दोन वर्षे काँग्रेसची मोहीम