बिहार विधानसभा निवडणुकीत जनता परिवाराशी काँग्रेस  हात मिळवणी करील, असे सूतोवाच काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केले. भाजपचा रथ बिहारमध्ये रोखल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनसुबे उधळून लावता येतील, हा हेतू त्यात आहे, असे त्यांनी सांगितले.
रमेश म्हणाले, की जनता परिवाराच्या एकत्र येण्याचे आपण स्वागतच करतो. जनता परिवाराप्रमाणे काँग्रेससमोरही बिहारमध्ये समस्या आहेत. सर्वासाठी बिहार ही पुढची कसोटी आहे. दिल्ली निवडणुकीने मोदींचे मनसुबे उधळले गेले व आता भाजपला बिहारमध्ये रोखणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे जनता परिवार एकत्र येणे व भाजपविरोधी गट एकत्र येणे ही स्वागतार्ह बाब आहे.
काँग्रेसचे उद्दिष्ट २०१९ या लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळवणे हे आहे, असे सांगून ते म्हणाले, की त्यापूर्वी नोव्हेंबर २०१५ मध्ये आम्हाला बिहारमध्ये भाजपला रोखायचे आहे. भाजपला रोखण्यासाठी आम्ही उपाययोजना करू व त्याचा देशाच्या राजकारणावर परिणाम होईल, डाव्या पक्षांच्या अध:पतनाबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.  डावे प्रागतिक व निधर्मी मूल्यांची एक शक्ती म्हणून काम करीत राहिले .पण त्यांची आर्थिक धोरणे मात्र कालसुसंगत नाहीत असे रमेश यांनी सांगितले.