जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचे पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचलले. राज्यसभेत या विषयावर जशी वादळी चर्चा झाली तशीच चर्चा आणि आरोपांच्या फैरी लोकसभेतही झडताना दिसत आहेत. एकीकडे कलम ३७० रद्द झाल्याने सगळा देश आनंद साजरा करतो आहे मात्र काँग्रेस नेत्यांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा आहे असा आरोप भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी केला.

मोदी सरकारने कलम ३७० बाबत निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्याकडून तसं अधिकृत पत्रकच जारी करण्यात आलं आहे. आता काँग्रेस नेतेही तेच म्हणत आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? पाकिस्तान हा काळा दिवस असल्याचं म्हणतं आहे आणि तुम्ही त्यांचीच साथ देत आहात का? असा प्रश्न भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी विचारला आहे.

आम्हाला देशाचं हित हवं आहे असं काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी यांनी म्हटलं. मात्र भाजपा खासदारांनी गदारोळ सुरु केला तेव्हा ते खाली बसले. त्यानंतर अमित शाह यांनी चौधरी यांना उत्तर देत देशासाठी कलम ३७० हटवणं का गरजेचं आहे आहे हे स्पष्ट केलं. मी जेव्हा जम्मू-काश्मीर असे म्हणतो तेव्हा पाकव्याप्त काश्मीर हा त्याचाच भाग आहे असं अभिप्रेत असतं. जम्मू काश्मीरच्या सीमांंमध्ये मी पाकव्याप्त काश्मीर आणि सियाचीन हे दोन्ही भाग समाविष्ट केलेले असतात असेही अमित शाह यांनी म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू काश्मीरचाच भाग आहे तो मिळवण्यासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावू असंही शाह यांनी म्हटलं

आता याच मुद्द्यावरून जी चर्चा सुरु आहे त्या चर्चेत काँग्रेस नेत्याच्या तोंडी पाकिस्तानची भाषा आहे असं प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भाजपा सरकारने कलम ३७० बाबत कमलीची गोपनियता बाळगली होती. राज्यसभेत सोमवारी जेव्हा सगळ्यांनी अमित शाह यांचा प्रस्ताव ऐकला तेव्हा गदारोळ सुरु झाला. तसाच गदारोळ आज लोकसभेतही पाहण्यास मिळाला.