उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरूणीच्या बलात्काराची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातीलच बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दोन तरूणांनी आपल्या ओळखीच्या तरूणीला भेटण्यासाठी बोलावलं आणि तिच्या बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तरूणांनी गंभीर परिस्थितीत त्या तरूणीला रिक्षात बसवून तिच्या घरी पाठवून दिलं. परंतु त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणांवरून काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“उत्तर प्रदेशातील जंगलराजमध्ये मुलींवर अत्याचार आणि सरकारची दडपशाही सुरू आहे. कधी त्यांनी जिवंत असताना सन्मान दिला नाही आणि मृत्यूनंतरही त्यांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार दिला नाही. बेटी बचाओ नाही तर ‘तथ्य लपवा, सत्ता वाचवा’ हीच भाजपाची घोषणा आहे,” असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला.

काय म्हणाले होते पीडितेचे वडिल?

पार्थिव घरी आणले जावे यासाठी पोलिसांकडे वारंवार विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप पीडितेच्या कुटुंबाने केला होता. पीडितेच्या वडिलांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार आम्ही या अंत्यसंस्काराला विरोध करत असतानाही तिच्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. “हिंदू संस्कृतीमधील परंपरेनुसार आम्हाला मुलीवर अंत्यसंस्कार करायचे होते. त्यामुळेच आम्ही दिवसा अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली होती. आमच्या सर्व नातेवाईकांनी मुलीच्या अंत्यस्कारामध्ये सहभागी होऊन तिचे अंत्यदर्शन घ्यायचे होते. मात्र आमच्या मुलीचा मृतदेह पोलीस बळजबरीने घेऊन गेले. आमच्यापैकी कोणालाही तिच्या पार्थिवाजवळ जाऊ दिले नाही. आमच्यापैकी कोणीच तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालं नाही. मला माझ्या मुलीचे अंत्यदर्शनही पोलिसांनी करु दिले नाही. अंत्यसंस्काराआधी मला तिचा चेहराही पाहता आला नाही,” असं मुलीचे वडील रडतच सांगत होते.