केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे करोनाची लागण झालेल्या, तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची कोणतीही माहिती नसल्याचं वृत्त समोर आलं होतं. “आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि अशाप्रकारची माहिती केंद्रीय स्तरावर आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे पाहिली जात नाही. जे पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेअंतर्गत मागणी करतात त्यांची माहिती राष्ट्रीय स्तरावर ठेवली जात असल्याची माहिती,” केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चोबे यांनी दिली होती. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- Coronavirus: भारतातील रुग्णसंख्येने ओलांडला ५२ लाखांचा टप्पा

“प्रतिकूल डेटा मोदी सरकार. .. थाळी वाजवणं, दिवे लावणं यापेक्षा अधिक गरजेचं त्यांची सुरक्षा आणि सन्मान आहे. मोदी सरकार, करोना योद्ध्यांचा इतका अपमान का?,” असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून यावर टीका करत संताप व्यक्त केला.

आणखी वाचा- “मोदीजींचे काही ‘मित्र’ नव्या भारताचे जमीनदार होतील”

राज्यसभेचे खासदार बिनॉय विस्वम यांनी अश्विनी कुमार चौबे यांना यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. आरोग्य सेवा कर्मचारी जसे डॉक्टर्स, परिचारिका, मदतनीस, आशा वर्कर्स यांच्यापैकी किती जणांना करोनाची बाधा झाली आणि किती जणांचा मृत्यू झाला, असा प्रश्न मंत्र्यांना विचारण्यात आला होता. पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या १५५ आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यामध्ये ६४ डॉक्टर्स, ३२ नर्सिंग स्टाफ, १४ आशा वर्कर्स आणि ४५ अन्य कर्मचार्यांचा समावेश आहे.

आणखी वाचा- “मोदी सरकारची कृषी विधेयकं शेतकरी विरोधी,” केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा

कृषी क्षेत्रातील विधेयकावरूनही टीका

कृषी क्षेत्राशी संबंधित या तिन्ही विधेयकांविषयी राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. “मोदीजींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन दिलं होतं. पण मोदी सरकारच्या काळ्या कायदे शेतकरी आणि शेतमजूरांचं आर्थिक शोषण करण्यासाठी केले जात आहेत. हे जमीनदारीचं नवं स्वरूप आहे आणि मोदीजींचे काही मित्र नव्या भारताचे जमीनदार असतील. कृषी बाजार बंद झाला की, देशाची अन्न सुरक्षा संपली,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.