गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात सायकलवर दिल्लीहून बिहारमधील आपल्या गावी वडिलांना मागे बसवून १२०० किलोमीटरचं अंतर कापून पोहोचणाऱ्या ज्योती कुमारीची बरीच चर्चा झाली. यासाठी तिला बिहारची ‘सायकल गर्ल’ असं म्हटलं जाऊ लागलं. पण ज्या वडिलांसाठी तिनं सायकलवर १२०० किलोमीटरचं अंतर कापलं, त्यांचं काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यामुळे ज्योतीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. आपलं, आपल्या कुटुबाचं आता कसं होणार? या विचारात असणाऱ्या ज्योतीला अचानक काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी फोन केला आणि तिच्या सगळ्या चिंताच मिटल्या! काय झाली त्यांच्यात चर्चा?

“मी दीदींना सांगितलं मला तुम्हाला भेटायचंय!”

दरभंगामध्ये आपल्या घरी चिंतेत बसलेल्या ज्योती कुमारीची काँग्रेसचे स्थानिक नेते मशकूर अहमद उस्मानी यांनी शुक्रवारी भेट घेतली. प्रियांका गांधींनी लिहिलेलं सांत्वन करणारं पत्र त्यांनी ज्योती कुमारीला दिलं. त्यानंतर थेट प्रियांका गांधी यांनीच ज्योती कुमारीशी फोनवर संवाद साधला. ज्योतीनं प्रियांका गांधींसोबत झालेल्या चर्चेची माहिती एएनआयला दिली. “प्रियांका दीदींनी मला सांगितलं की काळजी करू नकोस. तुझं शिक्षण पूर्ण होईल. तुझ्या शिक्षणाचा आणि इतर खर्च पूर्ण केला जाईल”, असं ज्योती म्हणाली. “त्यांनी मला सांगितलंय की कधीही गरज लागली तर फोन कर. मी दीदींना सांगितलं की मला तुम्हाला भेटायचं आहे”, असं देखील ज्योती कुमारी म्हणाली. करोनाची परिस्थिची निवळल्यानंतर ज्योतीला प्रियांका गांधींची भेट घेण्यासाठी घेऊन जाऊ, अशी माहिती उस्मानी यांनी दिली.

Bihar Cycle girl jyoti paswan
बिहारची सायकल गर्ल ज्योती कुमारी

बिहारची ‘सायकल गर्ल’!

गेल्या वर्षी ज्योती कुमारीचे वडिलांना सायकलवर मागे बसवून प्रवास करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर ज्योती कुमारी राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली होती. आपल्या वडिलांना करोनाकाळात मदत करण्यासाठी ज्योती कुमारी दिल्लीला गेली होती. मात्र, लॉकडाउनमुळे ते दोघं दिल्लीत अडकले. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्यामुळे आणि लॉकडाउनमध्ये वारंवार वाढ होत असल्यामुळे अखेर ज्योती कुमारीनं बिहारमधल्या आपल्या घरी दरभंगाला जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर एक जुनी सायकल ज्योतीनं खरेदी केली आणि त्यावर बसून ते दोघे १२०० किलोमीटरचं अंतर कापून आपल्या घरी पोहोचले.

लॉकडाउनमधील ‘सायकल गर्ल’ झाली पोरकी! वडिलांना घेऊन केला होता १२०० किमी प्रवास

यानंतर ज्योती कुमारीला बिहारची सायकल गर्ल म्हटलं जाऊ लागलं. तिच्या या जिद्दीची दखल सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियानं देखील घेतली. इतकंच नव्हे, तर ज्योतीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इवांका ट्रम्प यांनी देखील ज्योती कुमारीच्या धैर्याचं कौतुक केलं होतं.