वस्तू आणि सेवा कर विधेयकाविरोधात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बुधवारी संध्याकाळी राहुल गांधी यांनी डाव्या पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतली असून सुमारे ४० मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जीएसटी विधेयकावर या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी जीएसटी विधेयकावर बुधवारपासून राज्यसभेत चर्चा सुरु झाली आहे. आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने जीएसटी विधेयक हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विधेयकाला विरोधकांकडून विरोध होऊ नये यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या या विधेयकाविरोधात राहुल गांधींनी कंबर कसली आहे. या विधेयकात काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी दुरुस्ती विधेयक मांडले आहे. रमेश यांच्या प्रस्तावाला डाव्या पक्षांचा पाठिंबा मिळावा यासाठी राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. राज्यसभेत केंद्र सरकारकडे बहुमत नाही. त्यामुळे विरोधकांच्या मदतीने रमेश यांच्या प्रस्तावाला मंजूर करुन घ्यायचे राहुल गांधींचे प्रयत्न आहे. केंद्र सरकारने जीएसटी विधेयक हे मनी बिलअंतर्गत मांडले आहे. त्यामुळे राज्यसभेने मंजूर केलेल्या दुरुस्त्यांचा कायद्यात समावेश करणे बंधनकारक नसेल. लोकसभा या दुरुस्त्या फेटाळून लावू शकते किंवा यात बदल करु शकते. जयराम रमेश यांनी मांडलेल्या प्रस्तावावर गुरुवारी चर्चा होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी आणि सीताराम येचूरी यांच्यात पश्चिम बंगालविषयावरही चर्चा झाल्याचे समजते. सीताराम येचूरी यांचा राज्यसभेतील कार्यकाळ लवकरच संपणार आहे. अशा स्थितीत डाव्या पक्षांना काँग्रेसची मदत लागणार आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेसची पश्चिम बंगालमध्ये काय भूमिका असेल यावर चर्चा झाल्याची एका हिंदी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.