देशातील कोटय़वधी मोबाइल वापरकर्त्यांचे एका दिवशी एकत्रितरीत्या तब्बल तीन कोटी तास ३० सेकंदांची करोना ‘कॉलर टय़ून’ ऐकण्यात वाया जात असल्याचे एका अग्रगण्य ग्राहक संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळले आहे.

ही करोना ‘कॉलर टय़ून’ आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजात होती. परंतु आता ती रद्द करण्यात आल्याची माहिती सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयास देण्यात आली. एका जनहित याचिकेद्वारे अमिताभ यांच्या आवाजातील या ‘टय़ून’बाबत आक्षेप घेण्यात आला होता.

प्रसिद्ध ग्राहक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून करोना ‘कॉलर टय़ून’ ऐकवण्यामुळे वाया जाणाऱ्या वेळेची माहिती जमवण्यात आली आहे. ही ‘कॉलर टय़ून’ मोठय़ा प्रमाणावर त्रासदायक असल्याचे म्हटले आहे. सर्व मोबाइल नेटवर्कवरून ती ऐकवली जाते. आपत्कालीन परिस्थितीत ही ‘कॉलर टय़ून’ त्रासदायक ठरते, कारण वापरकर्त्यांला फोन त्वरित स्वीकारला जाणे अपेक्षित असताना नाहक ‘कॉलर टय़ून’ ऐकावी लागते. त्याच्या महत्त्वाच्या कामातही व्यत्यय येतो आणि त्यास उशीर होतो तो वेगळाच, असे या संस्थेचे निरीक्षण आहे.

या ग्राहक संस्थेने या संदर्भात ग्राहक संरक्षण आणि दूरसंचार मंत्रालयाशी त्याचबरोबर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाशी (ट्राय) संपर्क साधला. याबाबत ‘ट्राय’ने प्रतिसाद दिला. ‘ट्राय’चे अध्यक्ष पी. डी. वाघेला म्हणाले की, करोना साथीशी संबंधित संदेशांची अनेकदा पुनरावृत्ती होते. शिवाय कालबाह्य़ कॉलर टय़ून हे त्रासाचे साधन बनले आहे. मोबाइल वापरकर्ते अशा संदेशांकडे मोठय़ा प्रमाणात दुर्लक्षही करतात. आता लोक सामाजिक अंतर नियम आणि मुखपट्टय़ांच्या वापरण्याबाबत जागरूक झाले आहेत.

करोनाविषयक संदेश टय़ून आता जनजागृती करण्याचे साधन राहिलेले नाही. या टय़ूनमुळे आपत्कालीन कॉल घेण्यासाठी ३० सेकंदांची वाट पाहावी लागते, असे मत एका माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञाने मांडले.

याचिकाही रद्दबातल

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील करोना ‘कॉलर टय़ून’ रद्द करण्यात आल्याची माहिती सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयास देण्यात आली. एका जनहित याचिकेद्वारे अमिताभ यांच्या आवाजातील या ‘टय़ून’बाबत आक्षेप घेण्यात आला होता. परंतु ती रद्द करण्यात आल्याने ही जनहित याचिका रद्दबातल करण्यात आली.

आता लसीकरणाचा संदेश

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ यांच्या आवाजातील ३० सेकंदांचा करोना संदेश ऐकण्यात कोटय़वधी मोबाइल वापरकर्त्यांनी अनेक महिने दिवसाचे अनेक तास वाया घालवले. आता अमिताभ यांच्या जागी कलाकार जसलीन भल्ला यांच्या आवाजातील लसीकरणाचा संदेश देणारी नवी ‘कॉलर टय़ून’ ऐकवण्यात येत आहे.