कुंभमेळा पार पडलेल्या हरिद्वारसह उत्तराखंडमधील चार शहरांमध्ये करोना कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील आणि राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, हरिद्वार, रुर्की, लक्सर, भगवानपूर या शहरात बुधवारी सायंकाळी ५ वाजेपासून करोना कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. ३ मेपर्यंत कर्फ्यू असणार आहे.

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये आयोजित महाकुंभ मेळा संपन्न होताच करोना कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनामुळे जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी याची घोषणा केली. हरिद्वारबरोबरच रुर्की, लक्सर, भगवानपूरमध्येही बुधवारपासून (२८ एप्रिल) करोना कर्फ्यू लागू केला जाणार आहे. या काळात वैद्यकीय सेवांसह अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली आहे.

आणखी वाचा- चिंता वाढतीये! देशात गेल्या २४ तासांत एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद

कुंभमेळ्यामुळे हरिद्वारमधील करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात दररोज १ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असून, दररोज १० जणांचा मृत्यू होत आहे. सध्या करोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी ३ मेपर्यंत करोना कर्फ्यू लावण्यात येत असल्याची घोषणा केली. बुधवारी ५ वाजेपासून कर्फ्यू लागू केला जाणार आहे.