गेल्या काही दिवसांपासून दररोज देशात करोनाबाधितांची विक्रमी नोंद होत आहे. भारतात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असं असतानाही पश्चिम बंगालमधील भाजपा नेत्यानं रॅलीदरम्यान एक अजब दावा केला आहे. देशातील करोनाचा प्रादुर्भाव संपला, असा दावा या नेत्याकडून करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी या ठिकाणी आयोजित रॅलीला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला आहे.

“करोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे,” अशी घोषणा पश्चिम बंगाल बीजेपीचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी केली. त्यांच्या रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणात लोकं जमा झाले होते. “काही लोकांना या ठिकाणी गर्दी पाहून आजारी पडल्यासारखं वाटत असेल. परंत ते करोनामुळे नाही तर भाजपाच्या भीतीनं आहे. करोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे. ममता बॅनर्जी विनाकारण लॉकडाउन लागू करत आहेत. भाजपानं बैठका आणि रॅलींचं आयोजन करू नये यासाठी हे केलं जात आहे,” असं घोष म्हणाले.

“आम्ही ज्या कोणत्याही ठिकाणी जातो तेथील स्थिती आपणहूनच रॅलीमध्ये बदलते,” असंही त्यांनी नमूद केलं. देशात दिवसभरात ९५ हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले होते. अशाच वेळी घोष यांचं हं वक्तव्य समोर आलं. बुधवारी पश्चिम बंगालमध्येही ३ हजार १०७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर ५३ जणआंचा मृत्यू झाला. गेल्या काही आठवड्यांपासून पश्चिम बंगालमध्ये दररोज ३ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद केली जात आहे. राज्यात आतापर्यंत ३ हजार ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर करोनाबाधितांची संख्याही दोन लाखांच्या जवळ पोहोचली आहे.