दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या संशयिताने १८ मार्च रोजी संध्याकाळी रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. तो ३५ वर्षांचा होता.

संशयित करोना पॉझिटिव्ह होता की, नाही याची हे नक्की नव्हते. करोनासदृश्य लक्षणं दिसून आल्यानं त्याला मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एक वर्ष ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये तो वास्तव्यास होता. मंगळवारी एआय -301 या विमानाने तो भारतात परतला. विमानतळावर त्याला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर करोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याला तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं.

रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले होते. परंतु कोणताही अहवाल मिळाला नव्हता. तपासणी अहवाल येण्यापूर्वीच रात्री त्या व्यक्तीने जबरदस्तीनं विलगीकरण कक्षाचा दरवाजा उघडला आणि सातव्या मजल्यावरून उडी मारली. आत्महत्या केलेली व्यक्ती पंजाबमधील शहीद भगतसिंग नगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे कुटुंबीय त्याला घेऊन जाण्यासाठी विमानतळावर दाखल झाले होते.