देशात टप्प्याटप्प्याने अनलॉक करताना आता जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. मात्र, त्याचवेळी करोना देखील पुन्हा वाढू लागल्याचं चित्र आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात तब्बल २३ हजार २८५ नवे करोनाबाधित सापडले आहेत. या वर्षभरातली ही एका दिवसातली सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. त्यामुळे देशभरातील एकूण करोनाबाधितांचा आकडा आता १ कोटी १३ लाख ८ हजार ८४६ इतका झाला आहे. याआधी गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी देशात २४ तासांमध्ये २४ हजार ७१२ नवे करोनाबाधित सापडले होते. त्यामुळे आता केंद्रीय प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनाकडून संबंधित राज्यांना योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

करोनाबाबतचा निष्काळजीपणा भोवला?

या वर्षी जानेवारी महिन्यापासून रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा कमी झाला होता. देशवासीयांसाठी ही दिलासादायक बाब होती. त्यात करोनाची लस देखील आल्यामुळे नागरिकांना हा मोठा दिलासा ठरला. मात्र, त्यामुळेच अनेक ठिकाणी करोनाबाबत निष्काळजीपणा देखील दिसू लागला. परिणामी रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली.

 

२४ तासांत ११७ मृत्यू!

गेल्या २४ तासांमध्ये देशात ११७ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ५८ हजार ३०६ इतका झाला आहे. भारताचा रिकव्हरी रेट देखील खाली उतरला असून आता तो ९६.८६ टक्के इतका आहे. देशात सध्या १ लाख ९७ हजार २३७ अॅक्टिव्ह करोना रुग्ण असून एकूण सापडलेल्या करोनाबाधितांपैकी हा आकडा १.७४ टक्के इतका आहे. तर देशाचा मृत्यूदर १.४० टक्क्यांवर स्थिर आहे.