केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लगार के. विजयराघवन यांचे भाकित

 

करोनाची तिसरी लाट अटळ असून त्यासाठी आपण सतत खबरदारी घेतली पाहिजे, असे केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी सांगितले.

करोनाची तिसरी लाट अटळ आहे. याचे कारण विषाणू अजून बऱ्याच प्रमाणात फिरत आहे. पण ही लाट केव्हा येईल, तिचे स्वरूप काय राहील हे सांगणे कठीण आहे. सध्याच्या करोना विषाणू प्रकारावर आताच्या  लशी परिणामकारक आहेत. पण अजूनही करोनाचे नवे विषाणू येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही विजयराघवन यांनी सांगितले.

जगभरात नवीन विषाणू प्रकार येतील तसे भारतातही ते येतील. त्यामुळे संक्रमणही वाढेल. असे असले तरी या केव्हातरी संसर्गाचा आलेख सपाट होणारच आहे, फक्त त्यासाठी प्रतिबंधात्मक उपायात ढिलाई करता कामा नये. प्रतिकारशक्तीला चकवा देणारे विषाणू धोकादायक ठरू शकतात. करोना संसर्गाचे रूप हे त्यावरून ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

आरोग्य खात्याच्या पत्रकार परिषदेत असे सांगण्यात आले, की सध्याची करोनाची लाट गंभीर असून तिचे भाकीत कुणी करू शकले नव्हते. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेशसह बारा राज्यात १ लाखाहून अधिक कोविड रुग्ण असून कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिाम बंगाल, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. सरकारने २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात १५ टक्के सकारात्मकता दर आहे. १ मेपासून १८-४४ वयोगटातील ६.७१ लाख जणांना लस देण्यात आली आहे.

निती आयोगाचे आरोग्य सदस्य व्ही.के.पॉल यांनी सांगितले, की करोना प्राण्यातून माणसात पसरत नाही, तर माणसातून माणसात पसरतो. डॉक्टर बंधूंनी या कठीण काळात पुढे येऊन लोकांना मदत करावी. दूरसंवादाच्या माध्यमातून औषधे द्यावीत. कारण बरेच लोक संसर्गग्रस्त असले तरी घरीच आहेत. लोकांनी अकारण एकमेकांना भेटू नये, घरी रहावे.

आरोग्य खात्याचे सह सचिव लव अगरवाल यांनी सांगितले, की परदेशातून मदत येत आहे त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. कुठल्या रुग्णालयांसाठी काय सुयोग्य आहे याची मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत.

देशभरात करोनाने ३७८० जणांचे बळी

भारतात गेल्या २४ तासात ३७८० बळी गेले असून आतापर्यंत दैनंदिन मृत्यूचा हा उच्चांक मानला जात आहे. महाराष्ट्रात ९०० बळी गेले असून उत्तर प्रदेशात ३५१ तर दिल्लीत ३३८ बळी गेले आहेत. किमान १३ राज्यात दिवसभरात १०० हून अधिक बळी गेले आहेत.  महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या गेल्या १४ दिवसात कमी होत आहे. सातारा व सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात रुग्णांची संख्या वाढली आहे.