जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. करोनाबाधितांच्या संख्येसह यामुळे मृत्यू झालेल्याची संख्या देखील वाढतच आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार चोवीस तासांत देशभरात 1 हजार 076 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून 32 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

या बरोबरच देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 13 हजार 835 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 11 हजार 835 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले 1 हजार 766 जण व आतापर्यंत मृत्यू झालेले 452 ही आकडेवारी समाविष्ट आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

देशातील कोविड १९ साठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये आतापर्यं १ लाख ७३ हजार आयसोलेशन बेड तयार करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. याव्यतरिक्त २१ हजार ८०० आयसीयू बेडही तयार करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

दरम्यान, १९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाच्या रूग्णांचा वाढण्याचा दर हा सरासरीपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ३ लाख १९ हजार ४०० करोनाच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.