करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागणी अनेक आठवड्यांपासून अनेक देशांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता हळूहळू या लॉकडाउनचे नियम शिथिल करत जनजीवन सर्वसामान्य करण्यासंदर्भातील निर्णय वेगवेगळ्या देशांमध्ये घेतले जात आहेत. मात्र करोनानंतरचे जग हे आधीसारखे नसेल असे चित्र सध्या सगळीकडे दिसत आहे. खास करुन कॉर्पोरेट ऑफिसमधील वातावरण हे पूर्णपणे वेगळं असण्याची शक्यता दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी कंपन्या यासंदर्भातील विचार करत असल्याचे दिसत आहे. असं असलं तरी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचा लॉकडाउन उठवल्यानंतर ऑफिसला जाण्याची भिती ९३ टक्के कर्मचारी वर्गाला वाटत असल्याची माहिती एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

लॉकडाउनचे नियम शिथिल करुन पुन्हा शहरांमधील वेगवेगळी ऑफिसेस सुरु करण्यासंदर्भातील नियोजन सरकारी पातळीवर सुरु आहे. मात्र त्याचवेळी एका सर्वेक्षणामधून वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करणारे भारतीय कर्मचारी हे लॉकडाउननंतर पुन्हा ऑफिसला जाण्यासंदर्भात संभ्रमात असल्याचे चित्र दिसत आहे. या सर्वेक्षणानुसार ९३ टक्के कर्मचाऱ्यांना लॉकडाउननंतर पुन्हा ऑफिसला जाताना करोनासंदर्भातील भिती मनात असेल असं मत व्यक्त केलं आहे. तर ८५ टक्के कर्मचाऱ्यांनी पुन्हा कार्यालय सुरु होण्याआधी ते पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात यावे असं मत व्यक्त केलं आहे.

आरोग्याशी संदर्भात गोष्टींवर कोणत्याही यंत्रणेमार्फत आपल्याव नजर ठेवण्यासंदर्भात काही योजना असल्या तर त्यासाठी आपली संमती असेल असं मत ८२ टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. मात्र आपली माहिती कुठेही वापरली जाणार नाही याबद्दलचे आश्वास दिल्यास आपण अशापद्धतीच्या गोष्टींसाठी सहकार्य करु असं मत १८ टक्के कर्मचाऱ्यांनी नोंदवलं. तर ऑफिसच्या ठिकाणी ९६ टक्के कर्मचाऱ्यांनी आऱोग्याच्या दृष्टीकोनातू घेण्यात आलेल्या कोणत्याही पद्धतीच्या नवे नियमांचा अवलंब करण्याची तयारी दर्शवली आहे. हे नियम अंमलात आणताना थोडा त्रास सहन करण्याची आपली तयारी असल्याचेही कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. ८१ टक्के कर्मचाऱ्यांनी तुकड्या तुकड्यांमध्ये कामावर म्हणजेच ऑफिसला जाण्याची इच्छा बोलून दाखवली तर ७३ टक्के कर्मचाऱ्यांनी सध्या सुरु अलेल्या वर्क फ्रॉम होम पद्धतीचा अवलंब करण्यासंदर्भात सकारात्मक मत नोंदवले आहे.

माइंड मॅप अ‍ॅडव्हान्स रिसर्च या कंपनीने एफव्हाय आय या कंपनीच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, बेंगळुरुमधील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मते एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतली. भारतामधील ५६० लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ८५ टक्के कर्मचारी पुरुष होते तर १५ टक्के महिला कर्मचारी होत्या. या सर्वेक्षणामध्ये पुन्हा ऑफिस सुरु झाल्यानंतर आपल्या आरोग्यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यांची संख्या ५९ टक्के असल्याचे दिसून आले. तर २५ टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांना भविष्यातील आर्थिक चणचण ही सर्वात चिंताजनक बाब वाटत असल्याचे मत नोंदवले. तर १६ टक्के कर्मचाऱ्यांनी करोनाचे संकट बराच काळ कायम राहणार असल्याने अस्वस्थता वाटत असल्याचे मत नोंदवले आहे.

“करोनामुळे आपण कसे जगतो आणि काम करतो यावर परिणाम झाला आहे असं वरवर म्हणणं खूपच चुकीचं ठरले. खरंतर या एका साथीमुळे कामाकडे आणि आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन अगदी साध्यासाध्या गोष्टींबद्दलही बदलला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. भारतामधील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी नव्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल असं चित्र सध्या आमच्या सर्वेक्षणामधून समोर येत आहे,” असे मत एफव्हायआयचे प्रमुख कार्यकारी अधिकारी असणाऱ्या येइशान गोयल यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना व्यक्त केलं आहे. एफव्हाआय कंपनीने एप्रिल २०२० मध्ये हे सर्वेक्षण केलं होतं.